पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आवडणार नाही. माझ्या दूरच्या नात्यातील एक स्त्री मला खूप आवडते, पण तिच्याशी व इतर कोणाशीही या संदर्भात माझं बोलायचं धाडस झालं नाही.
 मला मूल दत्तक घ्यायचं नाही. माझ्या भावाच्या मुलांवर माझं खूप प्रेम आहे. मी त्यांचे खूप लाड करते. त्यांना मी खूप आवडते. पण दुसरीकडे बऱ्याचदा असंही वाटतं, की मी लग्न करू शकणार नाही, माझं स्वत:चं असं कुटुंब नसेल.
 गेली २-३ वर्ष मला नैराश्य आलंय.आपल्या जगण्याचा काय उपयोग? आपल्यालाच असं आयुष्य का मिळावं? असे प्रश्न पडतात. बऱ्याचदा आत्महत्येचा विचार येतो.
 मला वाटतं, की एखाद्या व्यक्तीची लैंगिकता कोणतीही असो त्याचा एक माणूस म्हणून स्वीकार झाला पाहिजे. त्याला दुजेपणाने वागवणं चूक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत गरजा कोणताही भेदभाव न होता पूर्ण झाल्या पाहिजेत.आमच्यासारख्या इंटरसेक्स व्यक्तींविषयी समाजाला माहिती झाली पाहिजे व समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.


३. प्रिया (अहमदनगर)

 माझी प्रियाशी ओळख सात-एक वर्षांपूर्वी झाली. मिलिंद (समपथिक ट्रस्टचा प्रोजेक्ट मॅनेजर)ला ती भेटली व त्याच्या ओळखीने ती समपथिक ट्रस्टमध्ये कामाला लागली. साडी किंवा पंजाबी ड्रेस घालून संस्थेत यायची. कानात डूल घालायची. मधूनच पायात पट्या घालून यायची. अधूनमधून दुकानं मागत (म्हणजे 'मंगती' करत-पैसे मागत) पाल्यावर, "कोणाला सुट्टे पैसे हवेत का?" असं विचारून लोकांकडून मागितलेले सुट्टे पैसे द्यायची व बंदे पैसे घ्यायची. स्मरणशक्ती कमी म्हणून कधीकधी चपला विसरून तशीच जायची.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ९०