पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिच्यात फारशी गुंतले नाही. ती दुसऱ्या गावची होती. त्या काळात सेलफोन, इंटरनेटचा फारसा प्रसार झाला नव्हता. एका वर्षानंतर ती गावी निघून गेली व आमचा संपर्क कायमचा तुटला.
 आपण वेगळे आहोत, याचा त्रास नको म्हणून मी स्वतःला शिक्षण आणि अन्य गोष्टींमध्ये गुंतवून घेतलं. स्वत:च्या गरजांकडे किंवा स्वत:च्या वेगळेपणाकडे मुद्दामहून कधी फारसं लक्ष दिलं नाही. बी.कॉम. नंतर मी एम.सी.ए. केलं.
 शिक्षण झाल्यावर मी नोकरी करू लागले. माझ्या नोकरीच्या ठिकाणी कोणालाही माझ्या वेगळेपणाची माहिती नाही व कोणाला सांगावं असं वाटतही नाही. नोकरीत आजूबाजूला मला माझ्यासारखं वेगळेपण असलेले लोक माहीत नाहीत. माझ्यासारख्या मित्रमैत्रिणीही नाहीत. पण आता माझ्यासारखी इतरही माणसं आहेत हे जाणून बरं वाटलं. मला समाजकारणात व राजकारणात खूप रस आहे. त्यामुळे नोकरीबरोबर मी या विषयांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेते. हळूहळू गावात माझं नाव झालंय; मला लोक मान देतात.
 घरचे लग्नाचा विषय काढत नाहीत. मला लग्न करण्यात रस नाही; पण सध्या माझं लैंगिक जीवन खूप उदास आहे. माझ्यासारख्या स्त्रीला लैंगिक सुखासाठी पार्टनर सहजासहजी मिळत नाही. लैंगिक सुख मिळवणं हे काही बाजारातून भाजीपाला आणण्याइतकं सोपं नाही.

 एक वर्षापूर्वी मी स्त्री जोडीदार शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर सुरू केला. घरी इंटरनेट नव्हतं म्हणून मी इंटरनेट-कॅफेमध्ये जाऊन पार्टनर शोधायचे. माझा इंटरनेटवर तितका विश्वास नाही, त्यामुळे तो नाद मी सोडून दिला. आजही मी एका पार्टनरच्या शोधात आहे; पण अजूनही मला भावेल अशी स्त्री सापडली नाही. पार्टनर मिळवण्यासाठी मी कोणतीच तडजोड करायला तयार नाही. मला कोणाचातरी 'दुसरा पर्याय' असायला कधीही

इंटरसेक्स :' एक प्राथमिक ओळख ८९