पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मी तिला या पुस्तकासाठी 'आत्मकथा सांगशील का?' असं विचारलं तेव्हा ती संकोचली. मिलिंदला एकांतात म्हणाली, “सर माझी खालची जागा बघतील का?" मिलिंद म्हणाला, "नाही, तुम्ही काळजी करू नका", तेव्हा ती तयार झाली. तिच्या स्मरणात नव्हतं, की काही वर्षांपूर्वी, एक वैद्यकीय कारणासाठी, तिने तिचं वेगळेपण मला दाखवलं होतं.
 टिपणी : प्रियाचं जननेंद्रियांतील वेगळेपण इंटरसेक्स वर्गात मोडतं का नाही हे विविध वैद्यकीय तपासण्या केल्याशिवाय सांगणं शक्य नाही.

- बिंदुमाधव खिरे


 मी अहमदनगरमध्ये जन्माला आलो. मी जन्माला आलो तेव्हा आई-वडील ४०शीच्या पुढे होते. दोन मोठे भाऊ आणि दोन मोठ्या बहिणी. मागे शेवटचा मी. मी जन्माला आलो तेव्हा दोन मोठ्या भावांची व एका बहिणीचं लग्न झालं होतं. घरची खूप गरिबी. लहानपणी चड्डीला भोक पडलं तर ठिगळ लावून तीच चड्डी वर्षानुवर्षं वापरत राहायचो. वडील धोतर तयार करायचं काम करायचे. खूप दारू प्यायचे. आई विड्या वळायला जायची.
 सर्वांना माहीत होतं, की माझी लघवीची जागा (लिंग) व गोट्या (वृषण) खूप छोटे आहेत. शाळेतील मुलं मला 'बुळ्या' म्हणून चिडवायची. 'ए, मला दाखव ना' म्हणून त्रास द्यायची, माझी चड्डी काढायची. मला खूप शरम वाटायची. मी लघवीला इतर मुलांबरोबर जायचो नाही. गरिबी असल्यामुळे घरात संडास नव्हता. उघड्यावर संडासला बसताना मी शर्टाचा पुढचा भाग पुढे सोडायचो म्हणजे इतरांना माझी पुढची जागा दिसणार नाही.
 पहिली झाल्यावर, एकदा मला शाळा शिक्षिकेनं अभ्यास चुकला म्हणून, छडीनं खूप मारलं, त्यानंतर मी शाळेत जाणं बंद केलं.

 लहानपणापासून माझं चालणं, बोलणं मुलींप्रमाणे होतं. घरी मी आईला स्वयंपाकाला मदत करायचो, भांडी धुवायचो, आईबरोबर विड्या वळायला जायचो.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ९१