पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोठी होताना मात्र मला जाणवू लागलं, की मी इतर मुलींपेक्षा थोडी वेगळी आहे. पण माझं वेगळेपण प्रकर्षाने मला किंवा इतरांना जाणवलं असा कोणताच प्रसंग माझ्या बाबतीत घडल्याचं मला आठवत नाही. माझ्या घरच्यांनीदेखील मला मुलीसारखंच वाढवलं व मला एका मुलाप्रमाणे पूर्ण स्वातंत्र्य दिलं. माझ्यावर कोणतीच मोठी बंधनं घातली नाहीत.
 माझ्या आईवडिलांना माझं वेगळेपण माहीत होतं; इतर जवळच्या नातेवाइकांनाही कल्पना आहे. पण कोणीच त्या संदर्भात बोलत नाही. मी जेव्हा ११वीत होते तेव्हा मला पाळी येत नाही म्हणून वैद्यकीय तपासणी केली. तेव्हा माझ्या आईवडिलांना माझ्यात नेमकं वेगळेपण काय आहे हे कळलं व मला आपण वेगळे आहोत याची संपूर्ण जाणीव झाली; पण घरात या वेगळेपणाची चर्चा कधीच झाली नाही.
 माझ्याकडे पाहताना लोकांना माझ्यात थोडं वेगळेपण जाणवतं. मला स्तन नाहीत त्यामुळे छाती सपाट आहे. मला गर्भाशय नाही, त्यामुळे पाळी येत नाही. मला वृषण आहेत. लिंग नाही पण एक छिद्र आहे व मी जेव्हा लैंगिकदृष्ट्या उत्तेजित होते तेव्हा या छिद्रातून पांढरा चिकट स्राव येतो. उत्तेजित करणारी दृश्यं पाहते तेव्हाही असं काहीसं होतं. कधीकधी मला वाटलं, की लोक मला 'हिजडा' समजत असतील. मी तशी नाही ना? असा कधीकधी मला प्रश्न पडला.
 मी स्वत:ला स्त्री समजते व मला स्त्रियांबद्दल लैंगिक आकर्षण आहे.पण असंही वाटतं, की मी मुलगा असते तर बरं झालं असतं. पण मला मी आहे तसं स्वीकारण्यापलीकडे पर्याय नाही. मी पूर्वी देवाला नवस बोलायचे, की मला इतरांसारखं बनव. मी एक परिपूर्ण स्त्री नाही ही खंत कायम मनात असते. या अशा अवस्थेचा मला प्रचंड राग येतो. कधीकधी आपण 'अॅबनॉर्मल' आहोत असं वाटतं.

 माझ्या वेगळेपणाविषयी मी कुणालाच सांगितलं नाही. घरच्यांना व

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ८७