पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मी समाजाच्या ठरावीक लिंगाच्या रकान्यात बसत नाही. मला असं वाटतं, की आमच्यासारख्यांनाही समाजात ताठ मानेनी एक परिपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे. आम्हालाही सर्व अधिकार मिळाले पाहिजेत; परंतु समाजात आमच्याविषयी इतकी अनास्था आहे, की ते अधिकार आम्ही मागू शकत नाही. चांगलं शिक्षण, स्थिर नोकरी आणि अनुरूप जोडीदार एवढ्याच आमच्या अपेक्षा आहेत; पण याही गोष्टी मिळवताना समाजात दुजेपणाची भावनाच पदरी पडते.
 याविषयी समाजात जनजागृती करणं गरजेचं आहे. हे काम समपथिक ट्रस्टनी करावं. असं केल्याने आमच्यासारख्यांचे हाल होणार नाहीत व समाजात प्रतिष्ठा मिळेल. पण सध्या समाजात तसं चित्र दिसत नाही. लोकांना असं काही असू शकतं हेच माहीत नाही.


२. मीना (महाराष्ट्र)

 मीना वैशालीच्या ओळखीची. वैशालीनी मीनाला माझ्या संस्थेबद्दल सांगितलं. पण मीना माझ्या संस्थेत आली नाही. वैशालीनं मीनाला माझ्या तर्फे विचारलं, की ती या पुस्तकासाठी मला मुलाखत देईल का? मीनानी मला भेटण्यास व मुलाखत देण्यास नकार दिला. मग मी विचारणा केली, की जर मी वैशालीला प्रश्नावली दिली तर मीना वैशालीला आपली आत्मकथा सांगेल का? मीना तयार झाली. तिने वैशालीला मुलाखत दिली व ती वैशालीनी लिहून काढली.त्याच्यावरून मी मीनाची आत्मकथा मांडली आहे.

- बिंदुमाधव खिरे


 माझ्या घरी मी, दोन भाऊ व आईवडील असं आमचं मध्यमवर्गीय कुटुंब. लहानपणी मी वेगळी आहे असं काहीच जाणवलं नाही. लहानाची

इंटरसेक्स :एक प्राथमिक ओळख ८६