पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. म्हणूनच ते मला कधीच वैयक्तिक प्रश्न विचारत नाहीत. मात्र त्यांनी मला कधीच दुजेपणाची वागणूक दिली नाही. माझ्या सर्व नातेवाइकांना मी प्रिय आहे. माझ्या हुशारीविषयी कौतुक व कर्तृत्वाविषयी आदर आहे. सर्वांचं माझ्यावर प्रेम आहे. एखाद्या विषयावर प्रसंगानुसार आपुलकीने ते माझं मत विचारतात. आता आमचे शेजारीही माझ्या शिक्षणाचं कौतुक करतात. मला आनंद वाटतो, की या सर्वच लोकांना माझ्यातल्या लैंगिक वेगळेपणापेक्षा माझं कर्तृत्व जास्त महत्त्वाचं वाटतं.
 मी शिक्षण पूर्ण केलं व सरकारी नोकरी स्वीकारली. कालांतराने एम.एस.डब्ल्यू (मास्टर्स इन सोशल वर्क) केलं. माझ्या एम.एस.डब्ल्यूच्या काही शिक्षकांना माझ्याविषयी माहिती आहे.
 आमच्यासारख्या मुला-मुलींसाठी काम करणाऱ्या काही संस्था आहेत. उदा., 'समपथिक' व 'लाबीआ'. या दोन संस्थांचा मला आधार मिळाला. 'जी. ए. ट्रस्ट', 'फिदा' व 'स्वामी विवेकानंद' नावाच्या काही संस्था आहेत ज्यांनी मला आर्थिक व इतर मदत केली, परंतु त्यांना मी कोण आहे, कशी वेगळी आहे हे माहीत नाही.
 मला माझी जोडीदार हॉस्टेलमध्ये भेटली. आम्ही दोघी एकाच हॉस्टेलमध्ये राहायचो. आधी आमच्यात नुसती मैत्री होती. हळूहळू आमची गट्टी पक्की झाली आणि आम्ही प्रेमात पडलो. एके दिवशी तिने मला प्रपोज केलं.

 त्या काळचा एक प्रसंग स्पष्ट आठवतो. मी आणि माझी गर्लफ्रेंड देवळात बसलो होतो. देवळातल्या एका खांबाला टेकून मी बसले होते आणि तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं. तितक्यात एक मुलगा बाइकवरून आला आणि त्याने आम्हाला पाहिलं. तो जोरात ओरडला, “ए हिजड्यांनो! इथे असले चाळे करू नका." मला खूप वाईट वाटलं व रागही आला. मी त्या मुलापाशी गेले आणि त्याला विचारलं, “तू असं का म्हणालास? आम्ही

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ८४