पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मी जास्तीत जास्त इतर मुलींसारखं राहण्याचा प्रयत्न करू लागले. पण, पुढे मला माझ्यातला वेगळेपणा जास्त जाणवू लागला. ही भावना अस्वस्थ करणारी होती. त्याचा परिणाम माझ्या आत्मविश्वासावर व्हायला लागला. मी जास्तीत जास्त इतर मुलींमध्ये राहायला लागले व सतत त्यांच्याशी माझी तुलना करायला लागले. हिच्यापेक्षा मी कशी वेगळी आहे, हे विचार सतत सतावू लागले.
 माझ्या संगतीतल्या सर्व मुली मुलांकडे पाहायच्या, परंतु मला मुलांमध्ये रस नव्हता. मला मुलीच आवडायच्या. इतर मुलींना संशय येऊ नये म्हणून मीही मुलांकडे पाहायचं नाटक करू लागले.
 मला इतर मुलींसारखं नटणं-मुरडणं आवडत नाही. मला मुलींच्या आवडीच्या काही गोष्टी, जसं की स्वयंपाक करणं, साफसफाई करणं आवडत नाही. मला दणकट पुरुषी कामं आवडतात.
 ११वीत मला खूप नैराश्य आलं. आपण या जगात का आलो व आपल्या अस्तित्वाचा काय हेतू आहे? असे प्रश्न सतत पडू लागले. म्हणून मी आध्यात्मिक पुस्तकं वाचायला लागले. उदा., स्वामी विवेकानंद. यानी माझा आत्मविश्वास पुन्हा वाढू लागला. आपल्या वेगळेपणाचा काही विशेष उद्देश आहे असं वाटू लागलं. देवाने आपल्याला मुद्दाम काही विशेष कामासाठी इतरांपेक्षा वेगळं बनवलं आहे असंही वाटू लागलं.
 मी अभ्यासात चांगली होते. अभ्यासाची आवडही होती. माझा समज असा होता, की मी वेगळी आहे, म्हणून मला खूप अभ्यास केला पाहिजे. मी माझी उणीव अभ्यासात भरून काढत होते. माझ्या सर्व शिक्षकांना माझं कौतुक वाटायचं. मी महत्त्वाकांक्षी होते. मला असं वाटतं, की जर का मी इतरांसारखीच असते तर अतिशय सामान्य राहिले असते व असली महत्त्वाकांक्षा माझ्यात आलीच नसती.

 माझ्या जवळच्या सर्व नातेवाइकांना माझ्या वेगळेपणाविषयी माहीत

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ८३