पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नव्हतं. आमच्या शेजारच्या बाई आमच्या आईला सारख्या म्हणायच्या, “ही अशी पुरुषासारखी खांदे उडवत का चालते?" माझ्या आईला याची लाज वाटली व तिने मला माझी चालण्याची पद्धत बदलायला सांगितली. मी त्यावेळी ६वी-७वीत होते.
 मी ८वी-९वीत असताना माझी आई मला डॉक्टरांकडे घेऊन जायचा आग्रह करू लागली. मला जायचं नव्हतं म्हणून मी नकार दिला. आई खूप मागे लागली म्हणून मी माझ्या आत्याला घेऊन एका डॉक्टरकडे गेले. मी मोठी झाल्यापासून, त्यादिवशी पहिल्यांदाच कुणी माझी जननेंद्रियं तपासली. त्यांनी मला तपासलं व माझी सोनोग्राफी केली. मी हळूच डॉक्टरना एक चिठ्ठी दिली, ज्यात मी त्यांना विचारलं, “मी तृतीयपंथी आहे का?"
 डॉक्टर म्हणाल्या, “तुला गर्भाशय नाही. त्यामुळे तुला पाळी येणार नाही." याचा मला थोडा धक्का बसला. डॉक्टरांनी माझी समजूत काढली. त्या म्हणाल्या, "अनेक लोकांच्यात विकलांगता असते. काही लोकांना हात-पाय नसतात. काही लोक अंधळे असतात. त्या लोकांच्या तुलनेत तुझं वेगळेपण काहीच नाही.” मला त्यांच्या अशा बोलण्याने हुरूप आला व थोडं बरं वाटू लागलं. काही लोकांच्या विकलांगतेची त्यांच्या दैनंदिन जीवनात बाधा येते, तसं माझं काहीच नव्हतं. मी घरी आल्यावर सर्वांना सांगितलं, की मला आता कसलीच भीती नाही आणि मी व्यवस्थित आहे.
 माझ्यात इतर स्त्रियांपेक्षा काय वेगळं आहे असं विचाराल तर, माझी शिस्निका मोठी आहे, मला गर्भाशय नाही, भगोष्टांमध्ये वृषण आहेत व योनीच्या ठिकाणी खड्डा आहे. मला शस्त्रक्रिया करून बदल करून घ्यावे वाटले नाहीत व आताही वाटत नाही. कधीतरी मधेच असं वाटतं, की ब्रेस्ट इंप्लांट करून घ्यावे, पण अजूनही तो निर्णय पक्का नाही.

 मी माझ्या वेगळेपणाविषयी कुणाशीच बोलायचे नाही. कुटुंबापलीकडे तेवढा विश्वास मला कुणावरच वाटत नव्हता.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ८२