पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग २ - कथा



१.वैशाली (महाराष्ट्र)

 ५-७ वर्षांपूर्वी वैशाली मला संकोचत भेटायला आली होती. बोलताना तिने स्वत:बद्दल माहिती सांगितली. इंटरसेक्स विषयाबद्दल माहिती विचारली. मी तिला थोडी माहिती दिली. अधिक माहिती व्हावी म्हणून मी तिला इंटरसेक्सवरच्या एका पुस्तकाचा काही भाग वाचायला दिला, पण त्यातील तांत्रिक वर्णनामुळे तिला तो कळला नाही. नंतर ती अधूनमधून भेटायला यायची किंवा फोन करायची. तिच्या बोलण्यातून तिची जिद्द, महत्त्वाकांक्षा दिसून यायची. शिक्षणानंतर काही वर्षांनी तिला सरकारी नोकरी मिळाली. नुकतीच तिला बढतीही मिळाली आहे. तिचा आत्मविश्वास वाढला आहे. मी या पुस्तकासाठी आत्मकथा शोधत आहे असं सांगितल्यावर वैशाली लगेच तिची आत्मकथा सांगायला तयार झाली. तिची मी मुलाखत घेतली व तिने दिलेल्या माहितीवरून तिची आत्मकथा लिहिली.

-बिंदुमाधव खिरे

 माझा जन्म एका खेडेगावात, माझ्या आईच्या माहेरी झाला. आईची प्रसूती घरच्या घरी केली गेली. रुग्णालयात नेलं नव्हतं. माझ्या वडिलांनी जेव्हा मला पहिल्यांदा पाहिलं, त्यावेळी माझ्यात असलेलं वेगळेपण त्यांच्या लक्षात आलं. ते मला डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासलं व त्यांनी वडिलांना सांगितलं, की बाळाचे वृषण कालांतराने नाहीसे होतील, मूल जसं मोठं होईल तसं त्यात योग्य बदल आपोआप होतील, तूर्तास काळजी करू नये. (लेखक-डॉक्टरांनी वैशालीच्या वडिलांना चुकीची माहिती दिली.)

 मी जशी मोठी झाले तसं इतर लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. माझ्या वागण्या-बोलण्यात असलेला वेगळेपणा त्यांना जाणवू लागला. परंतु मला, माझ्यात काही कमी आहे असं वाटतच

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ८१