पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लागला? तिच्यात काय बदल झाला म्हणून तिला लोक मुलगा म्हणू लागले? लोकांचा, प्रसारमाध्यमांचा त्रास नको म्हणून ती दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली.
 आता पुढे काय करायचं? 'स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया' (SFI) ने दुतीला सुचवलं, की अँड्रोजेन संप्रेरकं कमी करण्यासाठी तिने उपचार करावेत. असे उपचार करायचे का? हा प्रश्न पडला. तेव्हा जेंडर व स्पोर्ट्स अॅक्टिव्हिस्ट पयोष्नी मित्रा यांच्याशी तिने संवाद साधला.
 मी (बिंदुमाधव खिरे) पयोष्नीशी बोललो तेव्हा त्या मला म्हणाल्या, “उपचार करावे ही सूचना सर्वांगीण विचार करणारी नव्हती. हा फक्त अँड्रोजेन्सचा प्रश्न नाही. या उपायांनी आरोग्याच्या इतर पैलूंवर काय परिणाम होणार आहेत, याच्याबद्दल विचार करायला नको का?"
 दुती चांदने कास्टर सेमेन्याची डॉक्युमेंटरी पाहिली, पण दुतीने मात्र उपचार घेण्यास नकार दिला. सप्टेंबर २०१४ला तिने 'अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया' (AFI)ला अपील केलं, की २०१२मध्ये स्त्री खेळाडूंसाठी तयार केलेले अँड्रोजेन पातळीचे निकष अन्यायकारक आहेत; ते बदलावेत व दुती चांदला स्पर्धांमध्ये परत भाग घेऊ द्यावा.

 हे लिहितेवेळी दुतीला फक्त भारतीय राष्ट्र स्पर्धा व चायनामध्ये २०१५ला होणाऱ्या आशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी, अंतिम निकाल लागण्यास अवधी असल्यामुळे, तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे.

इंटरसेक्स :एक प्राथमिक ओळख ८०