पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठरलं. तोपर्यंत आयुष्य एका ठरलेल्या मार्गानी चाललं होतं. मार्ग सोपा नसला तरी इच्छाशक्तीवर, आपण केलेल्या कष्टांवर आपलं नशीब अवलंबून असतं हा ठाम विश्वास होता.
 परिस्थिती हलाखीची. आई-वडील विणकामगार. परिस्थितीत दौडीत भाग घ्यायचा हीच महत्त्वाकांक्षा घेऊन दुती चांद ओडिशातील आपल्या छोट्याशा गावाजवळ किनाऱ्यावर सराव करायची. सराव करताना तिला काहीजण टोमणे मारायचे- 'तू गडी आहेस का?', 'तू लग्न करणार का?' तिचे कोच रमेश सांगायचे, की 'तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. फक्त तुझ्या सरावाकडे लक्ष दे.'
 २०१४मध्ये दुती चांद कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धांसाठी जाणार होती.तिला जाण्याआधी काही तपासण्या करण्यास सांगितलं गेलं. यात काही विशेष नव्हतं कारण खेळाडू बंदी घातलेली औषधं/ड्रग्ज घेत नाहीत हे बघण्यासाठी त्यांच्या रक्त/लघवीच्या तपासण्या केल्या जाऊ शकतात. तिला सोनोग्राफीचीही चाचणी करण्यास सांगण्यात आलं. कालांतराने डॉक्टरांनी तिला सांगितलं, की तिच्या रक्तात अँड्रोजेन संप्रेरकांचं प्रमाण जास्त आहे (हायपरअँड्रोजेनिझम) व म्हणून तिला स्पर्धेसाठी जाता येणार नाही.
 तिच्यात अँड्रोजेन संप्रेरकं जास्त प्रमाणात का तयार होतायेत हे सांगता येणार नाही कारण तिचे वैद्यकीय रिपोर्ट (हे लिहितेवेळी) सार्वजनिकरीत्या उपलब्ध नाहीत. हे नक्की, की तिच्यामध्ये अँड्रोजेन संप्रेरकांचं प्रमाण जास्त असणं हे औषधं/ड्रग्जमुळे झालेलं नाही.
 जसजशी इतरांना ही बाब कळाली तसतशी तिच्याबद्दल चर्चा होऊ लागली. प्रसारमाध्यमं तिच्या घरी येऊन, 'तू मुलगा आहेस का मुलगी?' असं विचारून कमालीची असंवेदनशीलता दाखवू लागली.

 तिच्या घरच्यांना कळेना की नक्की काय चाललंय? आईला प्रश्न पडला, की आपल्या मुलीला समाज एक दिवस मुलगा कसा काय म्हणू

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ७९