पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

- तिला स्त्रियांचे सर्व अधिकार लागू होतात. उदा., नोकरी, संपत्ती/मालमत्ता इत्यादी अधिकार.
- तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आलेला आदेश रद्दबातल ठरवण्यात येत आहे व तिला ग्रेड II पोलीस कॉन्स्टेबल (स्त्री) म्हणून कामावर रुजू करण्यात यावं.
 याचा अर्थ असा, की व्यक्ती 'M to F' ट्रान्सजेंडर असो किंवा 'F to M' ट्रान्सजेंडर असो किंवा इंटरसेक्स असो, ती व्यक्ती पुरुष किंवा स्त्रीच्या (गुणसूत्र/जननेंद्रियांच्या) चौकटीत बसत नाही, ही सबब सांगून, सरकार त्या व्यक्तीशी भेदभाव करू शकत नाही. इंटरसेक्स व्यक्तींसाठी हा महत्त्वाचा निकाल आहे.


खेळातील कायदे


 इंटरसेक्स हा विषय समाजात चर्चेला आला तो मुख्यतः खेळाच्या अनुषंगाने. 'मॉडर्न ऑलिम्पिक्स'मध्ये सन १९००पासून स्त्रियांना काही खेळांच्या स्पर्धेत प्रवेश दिला गेला. पुरुष व स्त्रियांच्या स्वतंत्र स्पर्धा घेतल्या जातात. दोघांच्या स्पर्धा वेगवेगळ्या घेण्याचं कारण असं, की पुरुषांमध्ये अँड्रोजेन संप्रेरकांचं प्रमाण स्त्रियांच्या अँड्रोजेन संप्रेरकांच्या प्रमाणापेक्षा जास्त असतं. त्यामुळे खेळात पुरुषांची कामगिरी स्त्रियांपेक्षा चांगली असते.  पुढे भांडवलशाही व कम्युनिझम यांचं वैर विकोपाला गेलं. कम्युनिस्ट देश, आपल्याला ऑलिम्पिक्स स्पर्धेत यश मिळावं म्हणून, ऑलिम्पिक्समध्ये पुरुषांना स्त्रीवेशात स्त्रियांच्या स्पर्धेत उतरवतील व पदके पटकावतील या भीतीपोटी स्त्री खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करून त्या खरंच स्त्रिया आहेत ना, याची खात्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. [7]

 सुरुवातीला स्त्री खेळाडूंना तपासणीसाठी डॉक्टरांसमोर नग्न व्हावं

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ७६