पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९. कायदा


 ज्या व्यक्तीचं लिंग पुरुष किंवा स्त्री म्हणून निश्चितपणे ठरवता येतं, तिथे कायद्याची अडचण येत नाही. कारण त्या लिंगाचे कायदे, त्या व्यक्तीला लागू होतात. इंटरसेक्स व्यक्तींबद्दल मात्र अडचणी येतात. या विषयाबद्दल खूप गोपनीयता आणि अज्ञान असल्यामुळे अशा व्यक्तींचे प्रश्न अपवाद वगळता, भारतातील धोरणात, कायद्यांमध्ये विचारात घेतलेले दिसत नाहीत.
इंटरसेक्स व्यक्तींचे महत्त्वाचे कायद्याचे प्रश्न -
१. आईवडिलांनी इंटरसेक्स बाळाला मुलगा म्हणून किंवा मुलगी म्हणून वाढवलं तरी, इतर पुरुष/स्त्रियांना जे अधिकार कायद्याने दिले आहेत ते सर्व अधिकार या व्यक्तीला मिळतात का?
२. आईवडिलांनी इंटरसेक्स बाळाला मुलगा म्हणून किंवा मुलगी म्हणून वाढवलं व कालांतराने प्रौढ झाल्यावर त्या व्यक्तीला उमजलं, की आपला लिंगभाव वेगळा आहे, तर कायदा त्या व्यक्तीला पुरुष मानणार का स्त्री मानणार? उदा., जर एका इंटरसेक्स बाळाला मुलगा म्हणून वाढवलं गेलं व प्रौढ झाल्यावर त्याला उमजलं, की त्याचा लिंगभाव स्त्रीचा आहे तर कायदा त्याला काय मानणार? पुरुष का स्त्री?
३. इंटरसेक्स व्यक्तीला कोणत्या लिंगाच्या व्यक्तीशी लैंगिक संबंध करण्याचा अधिकार आहे?
 या प्रश्नांची उत्तरं २०१३-२०१४मध्ये मिळण्यास सुरुवात झाली. अजून बरेच प्रश्न बाकी आहेत व जशी उत्तरं शोधायचे प्रयत्न होऊ लागले आहेत, तसे नवीन-नवीन प्रश्नही पडू लागले आहेत. या प्रवासातले काही

महत्त्वाचे कायद्याचे निकाल पुढे दिले आहेत.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ७१