पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पालकत्व

 इंटरसेक्स व्यक्तींना मुलं होतात का? या प्रश्नाचं एक उत्तर नाही. विविध इंटरसेक्स व्यक्तींसाठी याचं उत्तर वेगळं असतं. याचाच अर्थ, कोणती जननेंद्रियं आहेत, त्यांचा किती विकास झालेला आहे, यावर मूल होणं अवलंबून असतं. उदा., जर गोनाड्सचे वृषण/स्त्रीबीजांड तयार झाली नसतील तर त्या व्यक्तीत पुरुषबीजं/स्त्रीबीजं तयार होत नाहीत.
 जसजसा तंत्रज्ञानाचा विकास होऊ लागला आहे, तसतसे गर्भधारणेचे नवीन पर्याय समोर येऊ लागले आहेत. 'असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स' या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने काहींना मुलं होतात. याचं एक उदाहरण पुढे दिलं आहे.

उर्वशी शर्मा (उत्तर प्रदेश) [4]


 उर्वशी शर्माची कथा मी वर्तमानपत्रातील बातमीच्या आधारे लिहिली आहे.

- बिंदुमाधव खिरे


 ३२ वर्षांच्या उर्वशीला लग्न होऊन ७ वर्षे झाली होती. तिला मूल नव्हतं. तिची बाह्य जननेंद्रिय स्त्रीची असल्यामुळे तिच्या लिंग गुणसूत्रात काही वेगळेपण असेल याचा अंदाज डॉक्टर आला नाही.
 कालांतराने डॉक्टरांनी तिची कॅरयोटाइप चाचणी केली. यात दिसून आलं, की उर्वशी 'XY फीमेल' आहे. म्हणजे तिची लिंग गुणसूत्र XY होती पण Y गुणसूत्रात SRY जीनचं वेगळेपण/अभाव होता. याच्यामुळे तिच्या शरीराची घडण स्त्रीसारखी झाली. गर्भाशय होतं, योनी होती. स्त्रीबीजांडं तयार झाली नव्हती. ती XY फीमेल आहे, हे कळल्यावर तिच्या नवऱ्याला धक्का बसला पण त्याने संवेदनशीलता दाखवली व सावरून म्हणाला, "असं असलं तरी ती माझी बायको आहे."

 जोडप्याला मूल हवं होतं. यासाठी डॉक्टरांनी उपाय सुचवला.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ६८