पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लैंगिक जीवन
 इंटरसेक्स व्यक्तींना जोडीदार मिळणं अवघड असतं. असं वेगळेपण नसलेला जोडीदार मिळणं अवघड असतं व वेगळेपण असलेल्या जोडीदाराचा शोध कसा घ्यायचा? जिथे समाजाच्या भीतीपोटी प्रत्येकजण आपलं वेगळेपण लपवतो, तिथे जोडीदार कसा शोधायचा? मीना म्हणाली, "माझ्यासारख्या स्त्रीला लैंगिक जोडीदार सहजासहजी मिळत नाही." (मीनाची आत्मकथा या पुस्तकात दिली आहे.)
 इंटरसेक्स व्यक्तीचं लैंगिक आकर्षण कोणाबद्दल असतं? पुरुष का स्त्री का दोन्ही? मानसिक आरोग्याच्या प्रकरणात आपण पाहिलं, की जननेंद्रियांची रचना आणि लैंगिक कल यांचा कोणताही संबंध नाही. याचा अर्थ काही इंटरसेक्स व्यक्तींना पुरुषांबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं, काहींना स्त्रियांबद्दल तर काहींना दोघांबद्दल.
 मला विचारलं जातं, की, इंटरसेक्स व्यक्ती संभोग कसा करतात? याचंही एक उत्तर नाही. त्या व्यक्तीला कोणती जननेंद्रियं आहेत, ती किती विकसित आहेत, ती किती कार्यशील आहेत याच्यावर त्यांना कोणत्या प्रकारचा संभोग करता येतो हे अवलंबून असतं.
 जननेंद्रियं पूर्णपणे विकसित नसतील तर काही जणांसाठी, संभोगातून मिळणाऱ्या सुखाला मर्यादा येतात. विशिष्ट केसेसमध्ये शस्त्रक्रियेचा फायदा होऊ शकतो. उदा., काही इंटरसेक्स स्त्रियांमध्ये योनी पूर्णपणे तयार झालेली नसते. अशा वेळी जर त्या व्यक्तीची इच्छा असेल तर शस्त्रक्रिया करून योनी पूर्णपणे तयार केली जाते. याच्यामुळे या योनीत लिंगप्रवेश करून संभोग करता येतो.

 अजून एक प्रश्न समोर येतो, तो म्हणजे पालकत्वाचा.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ६७