पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वावरताना समाजातील असहिष्णुतेमुळे त्या व्यक्तीवर खूप अन्याय होऊ शकतो.
 वैशालीनं कॉलेजमध्ये प्रवेश घेताना, ती कोण आहे हे तिने सांगितल्यावर त्या संस्थेत तिला प्रवेश द्यायचा की नाही यावर चर्चा झाली. एक मत होतं, की तिला प्रवेश दिला जाऊ नये तर काहींचं मत होतं, की ती शिकत आहे तर आपण तिच्या प्रयत्नांना हातभार लावला पाहिजे. आनंदाची गोष्ट ही, की तिला प्रवेश मिळाला. (वैशालीची आत्मकथा या पुस्तकात दिली आहे.)
 अशा व्यक्तींनी आपलं वेगळेपण लोकांना सांगावं का? हा मोठा प्रश्न असतो. समाजाकडून पावलोपावली आपल्याला त्रास होऊ नये म्हणून बहुतेकजण आपलं वेगळेपण लपवतात. सर्वांनाच आपलं वेगळेपण लपवणं सोपं नसतं. छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या मित्र/मैत्रिणींना संशय येऊ शकतो. लिंग नसेल किंवा खूप लहान लिंग असेल (मायक्रोपेनिस) तर पुरुष म्हणून वावरणाऱ्या व्यक्तीला मित्राच्या शेजारी मुतारीत उभं राहून लघवी करता येत नाही. मुलगी म्हणून वावरणाऱ्या व्यक्तीला पाळी येत नसेल तर मैत्रिणींना संशय येऊ शकतो. वैशाली म्हणाली, “मी सॅनिटरी नॅप्किन पर्समध्ये ठेवते पण तरीही मला पाळी येत नाही याचा मैत्रिणींना संशय येईल ही मला कायम भीती असते."
 सरकारी नोकरी मिळवतानाही अडचण येऊ शकते. शारीरिक तपासणी केल्यावर अशा व्यक्तीला पुरुष की स्त्री म्हणून घेणार? का अशा व्यक्तींना वैद्यकीय तपासणीत बाद करणार? तसं केलं तर हा त्यांच्यावर अन्याय नाही का? (आता या संदर्भात कायद्यात बदल होऊ लागले आहेत.)

 या सर्व सामाजीक अडचणींबरोबर, आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत म्हणून येणाऱ्या एकटेपणामुळे नैराश्य येतं. आपणच असे का? असा विचार मनात येतो. स्वत:च्या वेगळेपणाबद्दल द्वेष वाटू लागतो.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ६६