पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुटुंबामध्ये असं वेगळेपण कोणामध्ये दिसलं होतं का याचा तपशील मिळवावा.
• जर नवजात बालकाचं लिंग कोणतं आहे हे लगेच सांगता येत नसेल तर आईवडिलांना विश्वासात घेऊन वस्तुस्थितीची कल्पना द्यावी. त्यांचं काउन्सेलिंग करावं. त्यांना सांगावं, की अशा वेगळेपणाचं प्रमाण खूप कमी असलं तरी काही प्रमाणात असं वेगळेपण आढळतं. तसंच त्यांना सांगितलं पाहिजे, की त्यांचा काही दोष नाही व त्यांनी बाळाला प्रेमानं वाढवावं.
• यात लाज वाटण्याजोगं काहीही नाही पण इतरांसाठी हा कुतूहलाचा विषय बनू नये म्हणून डॉक्टरांनी गोपनीयता पाळली पाहिजे.
• जिथे मुलगा आहे की मुलगी आहे हे ठरवणं अवघड असेल तिथे त्या बाळाचं लिंग अंदाज घेऊन ठरवावं व त्या बाळाला असं नाव द्यावं, की जे मुलाला किंवा मुलीला दोघांना लागू होऊ शकतं उदा., 'सुहास'.
• बाळाच्या जिवाला धोका असेल तर जरूर तेवढीच कमीतकमी शस्त्रक्रिया करावी. मुलगा/मुलीसारखी दिसणारी जननेंद्रिय घडवण्यासाठी म्हणून कॉस्मेटिक' शस्त्रक्रिया (समाजात स्वीकार व्हावा म्हणून) करू नये. शस्त्रक्रियेसाठी पालक हट्ट करत असतील तर त्यांना समजून सांगा, की वयात आल्यावर शस्त्रक्रियेमुळे लैंगिक अनुभवावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून नुसतं 'बरोबर' दिसण्याचा हट्ट करू नका.
• तारुण्यात आल्यावर त्या मुला/मुलीचा लैंगिक पैलू प्रकट होणार आहे. जननेंद्रियांचे लैंगिक कार्य, वापर, संवेदनशीलता या सर्व गोष्टी कोणती शस्त्रक्रिया केली/कशी केली यावर अवलंबून असणार आहेत.
• ती व्यक्ती मोठी होऊ लागल्यावर हळूहळू त्याला किंवा तिला आपल्या लिंगभावाची व लैंगिक कलाची ओळख होणार आहे.
• मूल वाढवताना पालक बाळाला मुलगा मानत असतील तर त्याला मुलगा

म्हणून वाढवावं, मुलगी मानत असतील तर तिला मुलगी म्हणून वाढवावं.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ६३