पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रौढ इंटरसेक्स व्यक्तीला एक डॉक्टर म्हणाले, “मेडिकल कॉन्फरन्सला येशील का? मला तुझी केस सर्वांना दाखवायचीये." ती व्यक्ती घाबरली. डॉक्टरांकडे जाण्याचा तिने धसका घेतला. म्हणून पालक व डॉक्टरांनी इंटरसेक्स व्यक्तींचा अत्यंत संवेदनशीलपणे विचार करणं गरजेचं आहे.
• व्यक्ती प्रौढ झाल्यावर SASचा विचार करणं
 काही डॉक्टरांच्या मते SAS शस्त्रक्रिया करायची घाई करू नये. लहान असताना जननेंद्रियांमध्ये लैंगिक कार्यक्षमता आलेली नसते. काही उदाहरणं समोर आहेत, की लहान असताना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली व मोठं झाल्यावर त्या व्यक्तीला त्या शस्त्रक्रियेचे लैंगिक दुष्परिणाम आयुष्यभर सहन करावे लागत आहेत.
 दुसरं एक कारण असं, की त्या बाळाचा लिंगभाव कोणालाही माहीत नसतो. शस्त्रक्रिया करून मुलासारखी किंवा मुलीसारखी जननेंद्रियांची रचना केली; पण मूल मोठं होताना लक्षात आलं, की त्याचा/तिचा लिंगभाव विरुद्ध लिंगाचा आहे- तर मग काय करणार?
 म्हणून काही जणांचं म्हणणं असतं, की ज्या कारणांनी जिवाला धोका असेल, वेदना होत असेल ती दूर करण्यापुरतीच/तेवढीच शस्त्रक्रिया करावी.
इंटरसेक्स बाळाचं संगोपन
 इंटरसेक्स बाळाच्या संगोपनाबाबत इंटरसेक्स विषयातील तज्ज्ञ डॉ. मिल्टन डायमंड यांनी काही मार्गदर्शक तत्त्वे मांडली आहेत. [3] ही तत्वे मी माझ्या शब्दात संक्षिप्त स्वरूपात पुढे दिली आहेत.
• जननेंद्रियांतील वेगळेपणाला आजार, विकृती किंवा दोष अशा प्रकारचे शब्द वापरू नयेत.

• जननेंद्रियांत वेगळेपण आढळलं तर त्या बाळाची संपूर्ण शारीरिक तपासणी, चाचण्या करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आईवडिलांच्या

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ६२