पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाहीत ती काढून टाकतात किंवा जननेंद्रियांची रचना बदलतात.
 काही डॉक्टरांचं म्हणणं असतं, की अशी शस्त्रक्रिया लवकरात लवकर, मूल लहान असताना करावी. जर पालकांनी बाळाची अशी शस्त्रक्रिया करायची ठरवली तर या शस्त्रक्रियेच्या काय मर्यादा आहेत? ही शस्त्रक्रिया नाही केली तर काय अपाय होईल? किती उशिरानं शस्त्रक्रिया केली तर चालेल? शस्त्रक्रियेचे नजीकचे व दूरगामी (विशेषतः लैंगिक कार्यावर) काय परिणाम असू शकतात? शस्त्रक्रियेच्या अगोदर व शस्त्रक्रियेनंतर जननेंद्रियांच्या कार्याची काय मर्यादा असणार याची पालकांनी नीट माहिती करून घ्यावी.
 काही पालक 'आम्हाला मुलगाच पाहिजे' असा अट्टहास करतात. इंटरसेक्स बाळाची शस्त्रक्रिया करून त्याचा मुलगा बनवण्याकडे आपल्या देशात जास्त कल दिसतो. [1] कधी कधी डॉक्टर याचा गैरफायदा घेतात. या विषयीची एक बातमी २०११मध्ये 'हिंदुस्तान टाइम्स' वर्तमानपत्रात आली. [2] त्यांनी गौप्यस्फोट केला, की इंदौर (मध्य प्रदेश)मधील काही डॉक्टर योग्य निदान न करताच इंटरसेक्स बाळांवर शस्त्रक्रिया करून मुलगे बनवत आहेत. मुलगा हवा या अट्टहासापोटी लोक वाटेल ते करायला तयार असतात. पालकही आणि डॉक्टरही. या सर्वांत त्या बाळाचा दूरगामी विचार होताना दिसत नाही.
 शस्त्रक्रिया करायची ठरवली की चाचण्या व तपासण्या सुरू होतात. वारंवार होणाऱ्या तपासण्या, शस्त्रक्रियांनी होणारी वेदना व त्याच्याबद्दलची पालकांनी बाळगलेली लाज या सर्वांचा त्या मुला/मुलीवर परिणाम होतो. या विषयाची भीती, संकोच, लाज त्या व्यक्तीच्या स्वप्रतिमेवर विपरीत परिणाम करते.

 त्यात भर म्हणून काही डॉक्टर या विषयाबद्दल संवेदनशीलता दाखवत नाहीत. इंटरसेक्स व्यक्तीच्या भावना विचारात घेत नाहीत. एका

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ६१