पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपलब्ध असूनही अंधश्रद्धा, देवऋषीपण याच्यावर अनेकांचा विश्वास आहे. समस्येचं निरसन हे अंधश्रद्धेत शोधलं जातं. एक उदाहरण- माझ्या सहकाऱ्यानी मला सांगितलं, “५ वर्षांची मुलगी आहे व तिची शिस्निका लहान लिंगाइतकी मोठी आहे. 'मुलीला मुलाचं लिंग आलं आहे' म्हणून घरचे उपाय शोधत आहेत." मी म्हणालो, "त्यांना विचार, की मी त्यांना भेटायला आलो तर चालेल काय? किंवा ते मला भेटायला येऊ शकतील का? मी कोणतीही फी आकारणार नाही व कुठल्या डॉक्टरांकडे जायचं याचं मार्गदर्शन करीन." माझ्या सहकाऱ्यानी हे सर्व शांतपणे ऐकून घेतलं. मग म्हणाला, “मी विचारतो, पण मला नाही वाटत की ते येतील. ते उद्या तिला कुठल्या तरी देवऋषाकडे दाखवायला घेऊन जाणार आहेत." एक आठवड्यानी सहकारी मला म्हणाला, "ते देवऋषपण करून आलेत. ते तुमच्याकडे यायला तयार नाहीत." मुलीचे पालक मला भेटायला आले नाहीत व मलाही त्यांना भेटायची परवानगी मिळाली नाही.
 जिथे वैद्यकीय सुविधा आहेत तिथे बाळ इंटरसेक्स असेल अशी शंका आली तर डॉक्टर लगेच विविध तपासण्या करून निदान करतात. तपासण्यांच्या आधारे, बाळाला मुलगा म्हणून वाढवायचं का मुलगी म्हणून वाढवायचं याचा अंदाज घेतात. काही बाळांच्या बाबतीत हा अंदाज चुकू शकतो, पण तरी बाळाला वाढवताना त्याला कोणत्या तरी लिंगाचं मानून वाढवलं पाहिजे, म्हणून हा अंदाज लावणं आवश्यक असतं.
लिंग घडवायची शस्त्रक्रिया (SexAssignment Surgery-SAS)
 SAS करायची का? कधी करायची? हे ठरवण्याचा अधिकार कोणाला? याबद्दल विविध मतप्रवाह आहेत.
• SAS लवकरात लवकर करणं

 एकदा बाळाचं लिंग अंदाज घेऊन ठरवलं, की काही प्रसंगी डॉक्टर शस्त्रक्रिया करायचा सल्ला देतात व जी जननेंद्रियं, ठरवलेल्या लिंगाशी संलग्न

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ६०