पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

"१६ वर्षे झाली तरी पाळी आली नाही म्हणून मी डॉक्टरांकडे गेले. सोनोग्राफी केल्यावर मला कळलं की मला गर्भपिशवी नाहीये. मला खूप धक्का बसला." धक्का बसणं साहजिक आहे. कारण असं वेगळेपण असेल याची कल्पना नसते. कोणत्याच बाबतीत आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असं जाणवलेलं नसतं. त्यामुळे असं आकस्मिकपणे हे वेगळेपण कळल्यामुळे आपण एका क्षणात परके बनतो. जाणवतं, की आता इतरांचं व आपलं आयुष्य वेगळं असणार आहे. इतरांची व आपली सुख-दुःख एकच असतील ही 'कंफर्ट इन मेजॉरिटी' धारणा क्षणात नष्ट होते. आपल्यावर निसर्गानं अन्याय केला आहे असं वाटून नैराश्य येतं. आपल्याला गर्भाशय नाही हे जाणवल्यावर आपलं स्त्रीत्व कमी झाल्याची भावना मनात येऊ शकते. आपल्याला मूल होणार नाही याचं दुःख होतं.
 जर बाह्य जननेंद्रियांत मोठं वेगळेपण असेल, तर तारुण्यात येताना काही जण (विशेषतः मुले) इतरांसाठी कुतूहलाचा विषय बनतात. प्रिया म्हणाली ‘ए मला दाखव ना' म्हणून मला सारखं सतावलं जायचं. (प्रियाची आत्मकथा या पुस्तकात दिली आहे) सारखी चेष्टा, टवाळी होते. म्हणून अशा व्यक्तींच्या मनात लहानपणापासून न्यूनगंड निर्माण होतो, स्वत:चीच लाज वाटते. काही झालं तरी हे वेगळेपण समाजाला कळता कामा नये अशी दृष्टी बनते. 'कोणाला कळणार तर नाही?' अशी २४ तास काळजी लागून राहते. या विषयाबद्दल कोणापाशीही मोकळेपणाने बोलता येत नाही. भावनिक घुसमट होते. म्हणून लोकांनी संवेदनशीलता दाखवून अशा वेगळेपणाबद्दल कुतूहल दाखवणं व त्रास देणं कटाक्षानं टाळलं पाहिजे.
असं बाळ जन्माला आल्यावर कोणाचा आधार/सल्ला घ्यायचा?

 खेड्यापाड्यात जिथे अशिक्षित समाज आहे, जिथे गरिबी आहे, जिथे तज्ज्ञ वैद्यकीय सुविधा नाहीत तिथे अंधश्रद्धा/देवऋषीपण हेच मार्ग अवलंबले जातात. मोठ्या शहरात वैद्यकीय तज्ज्ञांच्या विविध सुविधा

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ५९