पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८. सामाजिक दृष्टी


 खरं पाहता शरीरातील वेगळेपण आपल्याला काही नवीन नाही. काहींचे केस कुरळे असतात, तर काहींचे दोन डोळे वेगळ्या रंगाचे असतात. काहींच्या हाताला किंवा पायाला पाचाच्याऐवजी सहा बोटं असतात. हे वेगळेपण स्वीकारायला समाजाला जड जात नाही, कारण याचा त्या व्यक्तीच्या जननेंद्रियांशी/लैंगिकतेशी काही संबंध नसतो.
 पण काही जणांचं वेगळेपण असं असतं, की जे जननेंद्रियांशी निगडित असतं. उदा., क्वचित वेळा मुलीच्या योनीमुखावर जन्मत:च योनिपटल नसतं. तर क्वचित वेळा मुलीच्या योनिपटलाला एकही छिद्र नसतं. काही मुलांमध्ये क्रिप्टॉरचिडिझम दिसतं. क्वचित वेळा मुलांमध्ये हायपोस्पेडिया दिसतो. असं वेगळेपण दिसलं तरी त्या मुला/मुलीच्या लिंगाबद्दल शंका नसते.
 पण जिथे जननेंद्रियांच्या रचनेवरून हे बाळ मुलगा आहे का मुलगी आहे हा संभ्रम पडतो तिथे मात्र समाजाची द्विधा मन:स्थिती दिसते. पालकांना चिंता वाटते. आपलं बाळ मुलगा आहे की मुलगी? लोक आपल्याला काय म्हणतील? आपल्या बाळाचं पुढं कसं होणार? घरच्यांना, नातेवाइकांना माहीत झाल्यावर ते त्याबद्दल बाहेर बोलत नाहीत. त्या बाळाच्या लैंगिकतेच्या वास्तवाकडे कानाडोळा केला जातो. घरचे, शेजार-पाजारचे त्या बाळाला स्वीकारतात; पण मोठं झाल्यावर तिन्हाईत माणूस त्या व्यक्तीला स्वीकारणार का?
 जर बाह्य जननेंद्रियांत वेगळेपण नसेल पण आंतरिक जननेंद्रियांत वेगळेपण असेल तर ते लक्षात येणं अवघड असतं. हे वेगळेपण खूप उशिरा लक्षात येऊ शकतं किंवा कधी कधी आयुष्यभर लक्षात येत नाही. काही वेळा

एखादया वैद्यकीय प्रश्नातून हे वेगळेपण लक्षात येतं. एक ताई म्हणाल्या,

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ५८