पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकसंधपणा असतो, या एकसंधपणाला पुरुष किंवा स्त्री हे सर्वसाधारणपणे नाव दिलं गेलं आहे. पण या सगळ्यांमध्ये इतक्या छटा आहेत, की हे सर्व बऱ्याचदा सामान्य माणसाच्या तर सोडाच अनेक डॉक्टरांच्याही समजेच्या पलीकडचं आहे. थोडक्यात सांगायचं तर यातलं आपल्याला फार कळतं असा आवखरंच कोणी आणू नये.
 पिंकी प्रामाणिकच्या गोष्टीवरून तर हे अगदी स्पष्टपणे समोर आलं आहे, की याच्यात खूप वेगळेपण असू शकतं. पूर्वी पुरुष आणि स्त्री असे दोन गठे बनवलेले होते. सर्व व्यक्ती या किंवा त्या गठ्यात बसतात, ही संकल्पना आता कालबाह्य झाली आहे हे समजून घेणं आवश्यक आहे.
 सर्वांनी लक्षात ठेवायची अजून एक गोष्ट म्हणजे तुमचा लैंगिकतेचा जो भाग आहे, याच्याशी कोणाचा काही संबंध नाही. ती निर्माण करण्यात पालकांचा (किंवा इतर कोणाचा) हात नाही. हे खरं आहे, की तुमची लैंगिकता तुमच्यासाठी खूप अडचणीची असू शकते, गैरसोईची असू शकते, पण तरीसुद्धा त्याबद्दल तुम्ही काहीही करू शकत नाही.

 याचा अर्थ असा, की इंटरसेक्स बाळाला डॉक्टर सांगतील त्या अंदाजाने मुलगा किंवा मुलगी म्हणून वाढवावं. पण लक्षात असू द्यावं की मोठं झाल्यावर ती व्यक्ती, आपण तिचा ठरवलेला लिंगभाव व आपल्याला वाटत असेल तो तिचा लैंगिक कल मान्य करेल असं नाही. ती व्यक्ती मोठी झाल्यावर त्या व्यक्तीला निसर्गानी जो लिंगभाव व लैंगिक कल दिला आहे तो स्वीकारण्यास पालकांनी, डॉक्टरांनी व समाजाने मदत केली पाहिजे.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ५७