पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऑक्टिव्हेटिशन' तर्कावर विश्वास वाढू लागला. [1]
 या सर्व उदाहरणांवरून उमगू लागलं, की लिंगभाव व लैंगिक कल हे दोन्ही लैंगिक पैलू आजूबाजूच्या वातावरणातून, शिक्षणातून, सामाजिक व कायद्याच्या नियंत्रणानुसार घडत नाहीत. गर्भ वाढत असतानाच हे पैलू घडतात. जन्माला आल्यावर ते बाळ जसजसं वाढू लागतं तसतसं त्याला निसर्गानी दिलेला लिंगभाव उमजू लागतो. तारुण्यात येईस्तोवर त्याला त्याचा लैंगिक कल माहीत नसतो. तारुण्यात आल्यावर त्याला त्याचा लैंगिक कल उमजतो, म्हणजे आपल्याला निसर्गानी भिन्नलिंगी बनवलं का उभयलिंगी बनवलं का समलिंगी बनवलं हे उमजतं.
 डॉ. भूषण शुक्ल म्हणाले, “याचा नीट अर्थ समजण्यासाठी लोकांनी पहिल्यांदा लैंगिकतेचे पैलू नीट समजून घेतले पाहिजेत. प्रत्येकाची लैंगिकता ही चार भागांत विभागली जाऊ शकते. हे समजावं म्हणून मी खूप सोपं करून सांगतोय, पण शास्त्रीयदृष्ट्या ते पूर्ण सत्य आहे, असं मी म्हणत नाही.
(१) मुलाचे/मुलीचे गोनाड्स- शरीरात वृषण आहेत, की स्त्रीबीजांड आहेत वती कशी काम करतात, याला आपण 'गोनाडपातळी' म्हणूयात.
(२) मुलाची/मुलीची बाह्य जननेंद्रिय. याला आपण शारीरिक पातळी म्हणूयात.
(३) त्या मुलाचा/मुलीचा लिंगभाव काय आहे? म्हणजे तरुणपणी ते स्वत:ला मुलगा की मुलगी समजतात. ही तिसरी पातळी म्हणूयात.
(४) वयात आल्यावर त्या मुलाला/मुलीला कोणत्या लिंगाच्या व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं? (स्त्री? पुरुष? का दोन्ही लिंगांच्या व्यक्तीबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं?) म्हणजे त्या व्यक्तीचा लैंगिक कल कोणता? ही चौथी पातळी.

 या चारही पातळ्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. ८०% लोकांमध्ये या सर्व पातळ्यांमध्ये एकसंधपणा (काँग्रुअन्स) असतो. म्हणजे त्या मुलाचे/मुलीचे गोनाड्स, जननेंद्रिय, लिंगभाव व लैंगिक कल यांच्यात

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ५६