पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७. मानसिक आरोग्य


 नवजात बालकाच्या जननेंद्रियांत जर असं वेगळेपण असेल, की ते बाळ मुलगा आहे की मुलगी आहे हे ठरवणं अवघड होतं, तर तिथे वैद्यकीय तपासण्या करून बाळाला मुलगा म्हणून वाढवायचं की मुलगी म्हणून वाढवायचं हा अंदाज घ्यावा लागतो. प्रश्न असा पडतो, की अंदाज घेऊन जे लिंग ठरवू त्याच लिंगभावाचं म्हणून ते मूल वाढणार का? म्हणजे एखाद्या इंटरसेक्स बाळाला मुलगी म्हणून वाढवलं- तिला मुलीचं नाव दिलं, मुलीचे कपडे घातले, तिला स्त्री लिंगानी संबोधलं तर, मोठं झाल्यावर ती व्यक्ती स्वतःला स्त्री मानेल का?
 १९६०च्या दशकात डॉक्टरांची वैद्यकीय धारणा होती, की बाळाला ज्या लिंगाचं म्हणून वाढवाल तो लिंगभाव ती व्यक्ती स्वीकारते व तशी त्याची/तिची विचारसरणी बनते. त्या काळातले सायकॉलॉजिस्ट जॉन मनी यांची धारणा होती, की जन्माला आल्यावर त्या बाळाची मानसिकता कोणत्याच लिंगभावाची नसते (सायकोसेक्शुअल न्यूट्रॅलिटी). जसं त्याला/तिला वाढवलं जाईल तसा त्याचा/तिचा लिंगभाव घडत जातो. याचा अर्थ, जॉन मनी यांची धारणा होती, की त्या मुला/मुलीचा लिंगभाव (म्हणजे ती व्यक्ती स्वतःला पुरुष का स्त्री मानते, त्या व्यक्तीचं भावविश्व पुरुषाचं आहे का स्त्रीचं) आजूबाजूच्या वातावरणातून, शिक्षणातून व सामाजिक अनुभवातून घडतो.
 या विचारांना अजून चालना मिळाली ती एका दुर्दैवी अपघातातून. १९७०च्या दशकात एका ८ महिन्याच्या मुलाचं (जॉन) लिंग शस्त्रक्रिया करताना नष्ट झालं. म्हणून तो १८ महिन्याचा असताना शस्त्रक्रिया करून

त्याचे वृषण काढून टाकले गेले आणि त्याला मुलगी (जोन) म्हणून वाढवलं गेलं. लहानाची मोठी होताना, काही काळ 'जोन'च्या वर्तणुकीवर लक्ष

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ५४