पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तिसरी अडचण अशी, की अशी मुलं जन्माला आल्याची नोंदणी सरकारी प्रसूती केंद्रात केली जात नाही. याला केरळ राज्य अपवाद आहे. केरळ राज्यात २०१२ सालापासून अशी नोंदणी केली जात आहे. [3] या नोंदणीचीसुद्धा मर्यादा आहे, कारण असं मूल जन्माला आलं, की बाह्य जननेंद्रियांत वेगळेपण असेल तर तपासण्या करून त्याची या यादीत गणना होईल. बाह्य जननेंद्रिय वेगळी नसतील पण आंतरिक जननेंद्रिय वेगळी असतील तर ते लक्षात येईलच असं नाही.
 चौथी अडचण अशी, की विविध समाजांमध्ये इंटरसेक्स व जननेंद्रियांतील वेगळेपणाची आकडेवारी वेगवेगळी असू शकते. जगाच्या सर्व भागात हे प्रमाण समान नाही. उदाहरणार्थ, '21-हायड्रोक्सिलेझ' एन्झाइमच्या कमतरतेमुळे होणारा 'नॉन-क्लासिकल CAH'चं प्रमाण 'अशकीनाझी ज्यू', 'हिसपॅनिक' व 'युगोस्लाव्ह' लोकांमध्ये जास्त आढळतं. [4] त्यामुळे इतर जगातील सर्वेक्षणाच्या आकडेवारी वरून भारतातही तीच आकडेवारी असेल असं ठोसपणे सांगता येणार नाही.
 जननेंद्रियांच्या काही वेगळेपणाची अजून आकडेवारी माहीत नाही.
 या सर्व कारणांमुळे इंटरसेक्स व्यक्तींचं प्रमाण किती आहे याची वेगवेगळी आकडेवारी समोर आली आहे, ती थोडक्यात पुढे दिली आहे.
 अॅन फॉस्टो-स्टर्लिंग म्हणतात, की १.७% नवजात बालक इंटरसेक्स असतात. [5]

 यावर डॉ. लिओनार्ड सॅक्स म्हणतात, की अॅन फॉस्टो-स्टर्लिंग यांनी जी आकडेवारी दिली आहे, त्यात काही अशा (जननेंद्रियांच्या) वेगळेपणाची आकडेवारी आहे, जी अनेक डॉक्टर्स इंटरसेक्स वर्गात घेत नाहीत. उदा., अनेक डॉक्टर्स क्लिनफेल्टर सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, ‘लेट ऑनसेट' CAH यांना इंटरसेक्स वर्गात घेत नाहीत. हे प्रकार वगळले तर इंटरसेक्सचं प्रमाण येतं ०.०१८% म्हणजे अंदाजे ५५०० नवजात बालकांमध्ये १ नवजात बालक

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ५२