पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

    (C) गोनाडस्च्या विकासातील वेगळेपण
• मिक्स्ड गोनाडल डिसजेनेसिस (Mixed Gondal Dysgenesis)
 क्वचित वेळा काही बाळांची जननेंद्रिय अशी असतात की एका बाजूला विकसित झालेलं गोनाड असतं (बहुतांशी वेळा ते विकसित झालेलं वृषण असतं) व दुसऱ्या बाजूला विकसित न झालेलं गोनाड असतं (म्हणजे गोनाडपासून वृषण तयार झालेलं नसतं व स्त्रीबीजांडही तयार झालेलं नसतं.) बहुतेकवेळा गर्भाशय, योनी व एकतरी स्त्रीबीजवाहिनी असते. काहीजणांचं वृषण वृषणकोशात उतरलेलं नसतं. काहीजणांमध्ये मोसाइसिझम दिसतं. बहुतेकांची बाह्य जननेंद्रिय पूर्णपणे मुलाची किंवा मुलीची विकसित झालेली नसतात. काहींमध्ये रुंद मान आढळते (वेब्ड नेक). काहींची उंची कमी राहते. अशा बाळाला मुलगा म्हणून वाढवायचं का मुलगी म्हणून वाढवायचं हे ठरवणं अवघड असतं. अविकसित गोनाडमध्ये कर्करोग होण्याची खूप शक्यता असते, म्हणून, डॉक्टर शस्त्रक्रिया करून गोनाड काढून टाकण्याचा सल्ला देतात.
• वृषण व स्त्रीबीजांड या दोघांचे अवशेष (दूहरमॅफ्रोडाइट)
 क्वचितवेळा बाळामध्ये वृषण व स्त्रीबीजांड या दोन्हींचे अवशेष आढळतात. याचे तीन प्रकार असू शकतात.
 १. काहींमध्ये दोन्ही बाजूला 'ओव्होटेस्टीस' असतात. (गोनाड विकसित होताना जर ते पूर्णपणे वृषण किंवा स्त्रीबीजांड न बनता त्याचं काही अंशी वृषण बनलं व काही अंशी स्त्रीबीजांड बनलं तर त्याला 'ओव्होटेस्टिस' म्हणतात.)
 २. काहींमध्ये एका बाजूला ‘ओव्होटेस्टिस' असतं व दुसऱ्या बाजूला वृषण किंवा स्त्रीबीजांड असतं.

 ३. काहींमध्ये एका बाजूला वृषण असतं व दुसऱ्या बाजूला स्त्रीबीजांड असतं.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ४३