पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तर अशा लिंगाला मायक्रोपेनिस म्हणतात. (Micropenis is a penis in which the Stretched Penile Length is more than 2.5 Standard Deviation below the mean for patient age.[2])
 मायक्रोपेनिस असणाऱ्या मुलांमध्ये विशिष्ट संप्रेरकांच्या कमतरतेमुळे किंवा गुणसूत्रातील वेगळेपणामुळे किंवा इतर काही कारणांमुळे लिंगाची लांबी खूप कमी राहते (उदा., हायपोगोनाडिझम, क्लिनफेल्टर सिंड्रोम). नवजात मुलामध्ये डॉक्टरांना मायक्रोपेनिस दिसून आलं तर लहानपणी औषधं देऊन लिंगाची वाढ करता येते.
क्रिप्टॉरचिडिझम
 मुलांमध्ये गोनाड्सपासून वृषण बनतात व गर्भ ७ ते ८ महिन्यांचा असताना वृषण पोटातून वृषणकोशाच्या दिशेने खाली उतरायला लागतात व 'इंगुआयनल कॅनाल'मधून वृषणकोशात उतरतात. काही मुलांमध्ये वृषणांचा खाली उतरण्याचा प्रवास मध्येच थांबतो. जर जन्माच्यावेळी मुलाचे एक किंवा दोन्ही वृषण वृषणकोशात नसतील तर त्याला क्रिप्टॉरचिडिझम म्हणतात.




 जन्मानंतर एका वर्षात काही मुलांचे वृषण वृषणकोशात उतरतात. जर या काळात वृषण वृषणकोशात उतरले नाहीत तर शस्त्रक्रिया करून ते खाली उतरवावे लागतात. तसं न केल्यास वयात आल्यावर त्या वृषणांमध्ये

पुरुषबीजं निर्माण होत नाहीत. त्या वृषणांत कर्करोग होण्याची शक्यता असते.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ३८