पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्हायला लागतं व मग काही काळाने पाळी पूर्णपणे बंद होते. साधारणत: एक वर्ष पाळी आली नाहीतर रजोनिवृत्ती आली आहे असं मानलं जातं. (क्वचित केसेसमध्ये काही स्त्रियांची ६० वर्ष उलटली तरी रजोनिवृत्ती येत नाही, तर क्वचित काहीजणींची रजोनिवृत्ती ३०च्या आसपासही येऊ शकते.)
 रजोनिवृत्ती आली, की स्त्रीबीज परिपक्व होणं बंद होतं, पाळी बंद होते. स्त्रीबीजांडात इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांच्या निर्मितीत घट झाल्यामुळे काहींना अधूनमधून चटका बसेल एवढं गरम अंग जाणवणं (हॉट फ्लशेस), चिडचिड होणं, दरदरून घाम येणं, खूप नैराश्य येणं हे बदल दिसू शकतात. लैंगिक इच्छा कमी होते. योनी, मोठं भगोष्ट, छोटं भगोष्ट व शिस्निका आकुंचन पावतात. योनीच्या आतील बाजूस येणारा ओलावा कमी होतो. योनी कोरडी पडल्यामुळे लिंग-योनी मैथुनाच्या वेळी घर्षणानं योनीत दुखू शकतं. काही स्त्रियांना कमी प्रमाणात तर काही स्त्रियांना खूप जास्त प्रमाणात हे त्रास होतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने 'इस्ट्रोजेन रिप्लेसमेंट थेरपी' घेता येते. त्याने हे दुष्परिणाम कमी होतात, लैंगिक इच्छेच्या निर्मितीस मदत होते.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख २३