पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुलगा वयात येताना
 मुलगा वयात यायच्या वेळी पिच्युटरी ग्रंथीत FSH व LHसंप्रेरकांच्या निर्मितीचं प्रमाण वाढतं. हे संप्रेरक रक्तात मिसळतात व वृषणांपर्यंत पोहोचतात. LH संप्रेरकाच्या प्रभावामुळे वृषणांमध्ये टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाच्या निर्मितीत वाढ होते. अँड्रोजेन संप्रेरकांमुळे मुलाची जननेंद्रिय मोठी होतात, स्नायू बळकट होतात, आवाज फुटतो. टेस्टोस्टेरॉन व FSHच्या प्रभावामुळे पुरुषबीजांची निर्मिती होऊ लागते.
 टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाचा लैंगिक इच्छेशी संबंध आहे. जर काही कारणानी या संप्रेरक निर्मितीत घट झाली तर त्याच्यामुळे लैंगिक इच्छा कमी होते. जर रक्तात टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण खूप कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधावाटे ते शरीराला पुरवता येतं. पुरुषाच्या उतार वयात अँड्रोजेन संप्रेरकांची निर्मिती व पुरुषबीजांच्या निर्मितीचं प्रमाण कमी होऊ लागतं.
लैंगिक उत्तेजना
 मुलगा वयात आला, की त्याच्या वीर्यकोशात वीर्य तयार व्हायला लागतं. त्याच्या वृषणात असंख्य (कोट्यवधी) पुरुषबीजांची निर्मिती होऊ लागते. लैंगिक इच्छा झाल्यावर त्याच्या लिंगाला उत्तेजना येते. हस्तमैथुन किंवा संभोग झाला की वीर्यपतन होतं. वीर्यपतनाच्या वेळी वृषणातील पुरुषबीजं, वीर्यकोशातील वीर्य, पूरस्थ ग्रंथीचा स्राव एकत्र होऊन लिंगावाटे बाहेर येतं व लिंगाची उत्तेजना जाते.
 वीर्य हा चिकट, पांढरा किंवा पिवळसर रंगाचा पदार्थ असतो. वीर्यपतनाच्यावेळी अंदाजे २-५ ml वीर्य (म्हणजे अर्धा-एक चमचाभर) लिंगातून बाहेर येतं. वीर्याच्या घट्टपणावर, त्याच्या प्रमाणावर गर्भधारणा

अवलंबून नसते, संभोगात मिळणारं सुख अवलंबून नसतं.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख २१