पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुरुषांमध्ये थोड्या अंशी इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉनची निर्मिती अॅड्रेनल ग्रंथींमध्ये होते. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांची बहुतांशी निर्मिती स्त्रीबीजांडात होते. स्त्रियांमध्ये अँड्रोजेन संप्रेरकं थोड्या अंशी अॅड्रेनल ग्रंथींमध्ये तयार होतात.

हायपोगोनाडिझम

 कोणत्याही कारणानी जर वृषण/स्त्रीबीजांडात संप्रेरकांची निर्मिती पुरेशा प्रमाणात होत नसेल तर त्याला हायपोगोनाडिझम म्हणतात. हायपोगोनाडिझममुळे जननेंद्रियांची वाढ पूर्णपणे न होणं, मासिक पाळी न येणं/ मासिक पाळीच्या चक्रात बदल होणं, रजोनिवृत्ती लवकर येणं, लैंगिक इच्छा कमी होणं, वंध्यत्व येणं असे विविध परिणाम दिसू शकतात. हायपोगोनाडिझम जन्मजातच असू शकतं (Congenital) किंवा कालांतरानी (Acquired) इतर कारणांनी होऊ शकतं (उदा., काही विशिष्ट औषधं/नशा घेतल्यामुळे).

हायपोगोनाडोट्रॉपिक हायपोगोनाडिझम

 वृषण/स्त्रीबीजांडातील संप्रेरकांची निर्मिती पिच्युटरी ग्रंथीतून स्रवणाऱ्या संप्रेरकांवर (उदा., FSH, LH) अवलंबून असते. जर पिच्युटरी ग्रंथीतून पुरेशा प्रमाणात संप्रेरकं तयार झाले नाहीत, तर त्याचा परिणाम वृषण/स्त्रीबीजांडातील संप्रेरक निर्मितीवर होतो. याला हायपोगोनाडोट्रॉपिक हायपोगोनाडिझम म्हणतात.

हायपरगोनाडोट्रॉपिक हायपोगोनाडिझम

 जर पिच्युटरी ग्रंथीतील संप्रेरक निर्मितीत अडचण नसेल पण वृषण/स्त्रीबीजांडातील वेगळेपणामुळे वृषण/स्त्रीबीजांडातून संप्रेरकांची निर्मिती पुरेशा प्रमाणात होत नसेल तर त्याला हायपरगोनाडोट्रॉपिक

हायपोगोनाडिझम म्हणतात.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख २०