पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मूत्रमार्गमुख व मूत्रमार्ग : मूत्रपिंडातून तयार झालेली लघवी मूत्राशयात साचते. तिथून लघवी मूत्रमार्गमुखातून बाहेर येते. शिस्निकेच्या थोडं खाली हे मूत्रमार्गमुख असतं.
बल्बोयुरेथ्रल ग्रंथी : मूत्रमार्गाला लागून बल्बोयुरेथ्रल ग्रंथी असतात. या ग्रंथींचं मुख मूत्रमार्गात उघडतं. यांचं कार्य अजून शास्त्राला कळलेलं नाही.
योनिमुख : मूत्रमार्गमुखाच्या खाली योनिमुख असतं. बहुतेक मुलींच्या योनिमुखावर एक पातळ कातड्याचा पडदा असतो. याला योनिपटल म्हणतात. योनिपटलाला एक किंवा अनेक छिद्रं असतात. मुलगी वयात आली व तिला पाळी आली, की या छिद्रातून पाळीचा स्राव योनिमुखातून बाहेर येतो. बोली भाषेत योनिपटलाला 'पडदा' किंवा 'सील' म्हणतात.
योनी : योनिमुखापासून शरीरात जी नलिका जाते, तिला योनी म्हणतात. ही नलिका लवचिक असते. या नळीच्या आतल्या बाजूस कमी-जास्त प्रमाणात ओलावा असतो. लिंग-योनी मैथुनाच्या (संभोगाच्या) वेळी पुरुष त्याचं उत्तेजित लिंग स्त्रीच्या योनीत घालून संभोग करतो. बाळंतपणाच्या वेळी मूल योनीतून बाहेर येतं.
बारथोलिन ग्रंथी : योनिमुखाच्याजवळ दोन बारथोलिन ग्रंथी असतात. या ग्रंथींचं मुख योनिमुखाजवळ उघडतं.
गर्भाशयमुख/ग्रीवा : योनी जिथे संपते व गर्भाशय सुरू होतं त्या भागाला गर्भाशयमुख म्हणतात.
गर्भाशय : गर्भाशय ही एक छोट्या पेरूच्या आकाराची पिशवी आहे. ही पिशवी लवचिक असते व गर्भधारणा झाली, की गर्भ जसा वाढतो तशी ती मोठी होते.
स्त्रीबीजवाहिन्या : गर्भाशयाला जोडलेल्या दोन स्त्रीबीजवाहिन्या असतात.

स्त्रीबीजवाहिनीच्या दुसऱ्या बाजूला तिच्या तोंडाशी अनेक 'फिक्रे' असतात.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख १७