पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यक्तींच्या अधिकारांचा विचार करत नव्हते. जसजसे हे प्रश्न समोर येऊ लागले तसतसं इंटरसेक्स व्यक्तींच्या अधिकारांवर बोललं जाऊ लागलं.
 १९९३मध्ये ISNA (Intersex Society of North America) गटाची स्थापना झाली. हळूहळू अनेक देशांत इंटरसेक्स विषयावर काम करणारे गट तयार झाले, उदा., Oll (Organization Intersex International). जिथे डॉक्टरांची चुकीची धोरणं दिसतील तिथे हे गट आक्षेप घेऊ लागले. या विषयाच्या बाबतीत पारदर्शकता असली पाहिजे, पालकांपासून/इंटरसेक्स व्यक्तींपासून ही माहिती लपवली जाऊ नये, इंटरसेक्स व्यक्तींच्या अधिकारांचा, त्यांच्या भवितव्याचा निष्पक्षपातीपणे विचार झाला पाहिजे, इंटरसेक्स व्यक्तींचा त्यांच्या शरीरावर अधिकार आहे व त्यांना त्यांच्या शरीराचं काय करायचं हे ठरवायचा अधिकार आहे, अशा मागण्या ते करू लागले. या मागण्यांना हळूहळू यश येऊ लागलं.
 आज अशी स्थिती आहे, की इंटरसेक्स विषयाबद्दल मग ते वैद्यकीय क्षेत्रात असू देत, नाहीतर मानवाधिकारांच्या कक्षेत असू देत, पाश्चात्त्य देशात उदा., अमेरिका, युरोपमध्ये बरंच काम चालू आहे. भारतात मात्र लैंगिकतेच्या कोणत्याच पैलूंबद्दल बोललं जात नाही, चर्चा होत नाही. शाळेतल्या मुलांना अगदी प्राथमिक लैंगिक शिक्षणसुद्धा दिलं जात नाही. या सनातनी वातावरणामुळे, आपल्या देशात लैंगिकतेच्या सर्वच विषयांबद्दल अज्ञान आहे आणि त्यातही इंटरसेक्स विषयाबद्दल कमालीचं अज्ञान आहे. या अज्ञानामुळे लोकांमध्ये अनेक गैरसमज व अंधश्रद्धा आहेत. त्यातून अशा व्यक्तींकडे बघण्याची असहिष्णू वृत्ती निर्माण झाली आहे. अत्यंत खेदाची गोष्ट आहे, की इंटरसेक्स व्यक्ती आपल्या सारखीच माणसं आहेत हे आपल्या समाजाला एकविसाव्या शतकातही उमजलेलं नाही.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख १३