पान:आलेख.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





 काळाचे ज्ञान, तसेच वैराग्ययुक्त ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. तू ब्रम्हतेजान युक्त

होऊन ब्रम्हज्ञानी पुराणांची महान प्रवक्ता होशील."

 अशी ही बुद्धिमान मार्कंडेय मुनीनं अनुभवलेली भगवंताची माया आहे.

ब्रह्मदेवानेही त्याला कल्पान्तापर्यंत आयुष्य पुराणरचयितृत्त्व व ऋषिश्रेष्ठत्त्व

बहाल केलं. हा ब्रह्मदेवाच्या पुष्कळ क्षेत्रातील यज्ञातही होता. त्याला कल्पांतीच्या

वटवृक्षांचं व प्रलयाचंही दर्शन झालं होतं. देवानं त्याला आपल्या पोटात स्थान

देऊन मायादर्शन घडविलं. देवाच्या स्तवनानंच त्यानं भवद्दर्शन प्राप्त करून

घेतलं.

 मार्कंडेयानं आपला एक आश्रम स्थापन केला होता. त्यासंबंधीची सर्व

माहिती पुलस्त्यानं रामाला सांगितली होती. महाभारतात वर्णन केलेल्या

सभापर्वातील मयसभेच्या प्रसंगी , पांडवमयसभेत प्रवेश करतात त्यावेळी

मार्कंडेय तिथं उपस्थित होता. ब्रम्हसभेत पांडव गेले होते त्यावेळीही मार्कंडेय

उपस्थित होता. धर्मराज वनवासात असतांना, हा मार्कंडेय त्याला भेटण्यासाठी

गेला होता. त्यावेळी श्रीकृष्णही तेथे उपस्थित होता. नारदाच्या सांगण्यावरून

यानं पांडवांना, अध्यात्मिक क्षेत्रातील पारलौकिक गती, भूपतीचं महात्म्य, ताक्ष्यै-

सरस्वती संवाद, वैवस्वत मनुचं चरित्र, युग निरूपण, विष्णुस्वरूप कथन, कलियू -

गवृत्त, कल्की अवतार आणि कृतयुग प्रारंभ या संबंधीचं सविस्तर निवेदन केलं

होतं. मार्कंडेयानेच धर्मराजाला प्रयाग महात्म्य सांगितलं होतं, 'सामर्थ्य असता

अधर्म आचरु नये' असा पांडवांना त्यानं रामाच्या आदर्शांवरून उपदेश केला. त्याच

प्रमाणे हेमामालीस, व्रत देऊन त्यास शापापासून मुक्त केलं.

 भागवताच्या १२ व्या स्कंधातील, अध्याय आठ नऊ व दहा यामध्येही

मार्कंडेयाची कथा आलेली आहे. मात्र मार्कंडेय हा सुप्रसिद्ध सप्त चिरंजीवातील

रुढ कल्पनेत गणला जात नसून तो आठवा चिरंजीव मानला जातो.

  'अश्वत्थामा बलिर्व्यासो हुनुमाश्च बिभीषणः ।

  कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः ||

 श्लोकात अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, विभिषण, कृप, परशुराम या

सात चिरंजीवांचा उल्लेख आढळतो. या सर्वश्रुत श्लोकात जरी मार्कंडेयाचे नाव

नसले तरी तो मोठा योगसामर्थ्यवान, श्रीहरीचा एकनिष्ठ भक्त होऊन सांप्रत

पृथ्वीवर फिरत आहे.


आलेख             ९१