पान:आलेख.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





 मार्कंडेयाने पित्याजवळील यथाशास्त्र अध्ययन पूर्ण झाल्यानंतर तपश्चर्या

केली. ब्रह्मचर्यव्रताची मोठी तीन दीक्षा घेतली. इंद्रिय निग्रह करून तो जटा आणि

वल्कलं परिधान करून राहू लागला. कमंडलू, दंड, यज्ञोपवीत, मेखला त्यानं धारण

केले. मौन धारण करून तो सकाळ-संध्याकाळ भिक्षा मागी. नंतर ती आपल्या

गुरु जवळ आणून देत असे. गुरूंची अनुज्ञा झाल्यावरच तो भोजन करीत असे. हे

स्वाध्यायाच खडतर व्रत आणि तपश्चर्या करूनच मार्कंडेय मृत्युंजय झाला; आणि

जन्मजात अल्पायुष्यावर मात केली. दीर्घायुष्यी आणि दहाव्या त्रेता युगातील

प्रसिद्ध अमर ऋषी म्हणून तो ओळखला जातो. त्याच्या पत्नीचं नाव घूमोर्मा

होते.

 जन्मतः त्याला फक्त ६ महिन्यांचच आयुष्य लाभलं होतं. परंतु ५ महिने,

२४ दिवस पूर्ण झाल्यावर, २५ साव्या दिवशीच मार्कंडेयाला सप्तर्षीचं दर्शन

झालं. त्यांच्या आशीर्वादानंच तो दीर्घायुषी झाला. वयाच्या ५ व्या वर्षी त्याची

मुंज झाली. सप्तर्षीनीच त्याला यज्ञोपवीत आणि दंड दिला होता.

 अत्यंत तीव्र योग साधना करून, योगी मार्कंडेयानं सहा मन्वंतरं घालविल्या-

नंतर सातव्या मन्वंतरात हे वृत्त इंद्राला समजलं. इंद्र मार्कंडेयाच्या तपश्चर्येनं

घाबरला आणि त्याला तपापासून भ्रष्ट करण्यासाठी गंधर्व, अप्सरा, मदन, वसंत,

मलय पर्वतावरील शीतल वायू, रजोगुणापासून उत्पन्न होणारा लोभ आणि मद

यांना त्याच्याकडे पाठवलं. इंद्राच्या आज्ञेनुसार गंधर्वांनी मदनाला आपल्या बरोबर

घेतलं, आणि हिमालयाच्या उत्तरेकडील बाजूच्या आश्रमात ते आले. पण मार्कंडे-

याच्या तेजापुढे त्यांना पराभूत होऊन परतावं लागलं.

 मार्कंडेयाची घोर तपश्चर्या, वेदाध्यन आणि इंद्रियदमन पाहून, नरनारायण

स्वरुपी, श्रीहरी त्याच्यावर प्रसन्न झाले. परमेश्वराच्या दर्शनानं मार्कंडेयाचा देह,

इंद्रियं आणि अंतःकरण भरुन गेली. भगवंतानं त्याचे तीव्र व्रताचरण पाहून प्रसन्न

होऊन त्याला वर मागण्यास सुचविलं, केवळ भगवंताच्या दर्शनानंच कृतकृत्य

झालेल्या मार्कंडेयानं परमेश्वराच्या, अगाध मायेचे दर्शन आपल्याला घडावं अशी

इच्छा प्रदर्शित केली. एकदा मार्कंडेय संध्याकाळच्या वेळी पुण्यभद्रा नदीच्या काठा-

वर ईश्वराची उपासना करीत बसला असतांना एकाएकी सोसाट्याचा वारा सुटला.

मुसळधार पाऊस पडू लागला, आणि पाहाता पाहाता पृथ्वी, अंतरिक्ष, आकाश,

नक्षत्रमाला यासह सारे त्रैलोक्य, (स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ) आणि दशदिशा

पाण्यामध्ये बुडून गेल्या, या महाभयंकर प्रलयाच्या वेळी एकटा मार्कंडेय मात्र तसाच

राहिला. त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली: विष्णूच्या त्या महामायेच्या चम-

त्कारानं तो ग्रस्त झाला.


आलेख           ८९