पान:आलेख.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





लोककल्याणासाठी वेचलेले विदुराचे जीवन सत्तालोलूपांना आकलन होणे अवघड

होऊन बसते. या पुण्यात्म्याची वाणी-कृती आदरणीय असली तरी आदरणीय ठरत

नाही. हेच या महाभारतातील व्यक्तिचित्रणातून सूचित केले आहे.

 पर्वतावरील मधाचे पोळे पाहून लुब्ध झालेला माणूस त्या पोळयापर्यंत चढत

जाऊन ते हाती लागावं म्हणून तो यत्न करू लागतो, पण पायाखालचा तुटलेला

कडा किती खोल आहे इकडे त्याचं लक्ष जात नाही. आणि शेवटी पाय घसरून

तो दरीत पडून मरतो तशी द्यूताच्या नशेनं उन्मत झालेल्या तुझ्या मुलांची गत

तशीच होईल असे तो धृतराष्ट्राला वजावतो.

 बागेतील वेलींवर दररोज फुलं मिळावीत म्हणून माळी वेलीची काळजी

घेतो. सगळी फुलं एकदमच मिळावीत म्हणूनच तो वेल उपटून घेत नाही. त्याप्रमाणे

तू पांडवावर लोभ ठेवून त्यांचा सांभाळ केला तर त्यांच्यापासून तुला पुनः पुनः

लाभ करून घेता येईल. उलट तुझा सर्वनाशच होईल. निस्पृह आणि न्यायप्रिय

महात्मा विदुराने हे सांगूनही त्याचा लाभ धृतराष्ट्राला घेता आला नाही. श्रीकृष्ण

शिष्टाईच्या वेळीही विदुराकडेच उतरतो आणि राजनीतिज्ञ विदुरही हेच जाणून

होता. श्रीकृष्णाला विदुराची योग्यता पटली होती आणि त्याला विदुराविषयी

नितांत आदर वाटत असे. श्रीकृष्णाच्या प्रेमादराला विदुर पात्र ठरला यात विदु-

राच्या व्यक्तित्वाची महनीयता आहे.

 या महात्म्याचा अंतही लक्षवेधी आहे. सर्वसंग परित्यागी विदुर, धृतराष्ट्र

गांधारी, कुंतीबरोबर तपश्चर्येला गेला. अरण्यातील एकान्तात विदुर आणि युधि-

ष्ठिराची गाठ पडली विदुर एका वृक्षाला टेकून उभा राहिला त्याने आपली दृष्टी

युधिष्ठिरावर स्थिरावली आणि आपली जीवनज्योत युधिष्ठिराच्या जीवनज्योतीत

विलीन केली. उभ्यानेच योगबळाने विदुर जीवन मुक्त झाला.


तीन:मार्कंडेय


 'मार्कंडेय' हा स्वायंभुव मन्वंतरातील मुकुण्ड ऋषीचा पुत्र. यानं शंकराची

आराधना करून चौदा कल्प आयुष्य मिळविले. एक चिरंजीव म्हणून तो ओळखला

जातो. चालू मन्वंतरातील भृगुकुलात मार्कंडेयाचा जन्म झाला. त्याच्या पित्यानेच

मार्कंडेयावर यथाविधि सर्व संस्कार केले. आपल्या तपाच्या वळावरच मार्कंडेयान

मृत्यूलाही जिंकलं होतं.


आलेख            ८८