पान:आलेख.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





दहा तीन टीपा

एक : प्राक्कथा


 आजच्या मराठी ललित साहित्यात प्राक्कथा विशेष लोकप्रिय आणि लेखक-

प्रिय होत आहेत. प्राक्कथा, पुराणकथा, दैवतकथा, इंग्रजीतील Myth हे सगळे

शब्द समान अर्थाने ओळखले जातात. संस्कृत वा प्राचीन मराठी साहित्याशी

संपर्क असलेल्यांना प्राक्कथा ही काही नवी कल्पना नाही. अतिप्राचीन साहित्यात

मुख्यकथा सांगत असताना अनेक फाटे या कथेला फुटतात अशावेळी एखादी गोष्ट

दृष्टांत देऊन किंवा उदाहरणाने समजावून सांगितलेली असते, सिद्ध करण्याचा

त्यात प्रयत्नही असतो. हे उदाहरण किंवा दृष्टांत समूहमनाने स्वीकारलेले प्रतीक

(Symbol) असते, जे प्राक्कथेतून उद्भवलेले असते. त्यात एखादा गुणविशेष

शिखराला पोहचलेला असतो किंवा बोध-तात्पर्यार्थ त्यातून सूचित होतो. त्यात

विलक्षण चमकदार आणि चटकदारपणा जाणवतो. क्षणभर या कथा ऐकणारा

आणि सांगणारा मंत्रमुग्ध होऊन जातो.

 प्राक्कथांचे अगदी नव्यानेच आकर्षण आजच्या मराठी ललित साहित्यिकांना

वाटत आहे. याचा अर्थ प्राक्कथांमध्ये नवा अनुभव अभिव्यक्त करण्याची क्षमता

आहे. त्या लवचिक आहेत म्हणून तात्कालिकतेवर त्या मात करू शकल्या. प्राक्कथा

आजच्या मराठी ललित लेखकाला विशेष करून भिनते. अभिव्यक्तीला सोपीची

वाटते. आपला अनुभव सामावला जातो. आणि मग त्या प्राक्कथानुभवातून

(Mythical experience) ललित लेखकाला हवे ते भावविश्व आंदोलित

करता येते.


आलेख           ६९