पान:आलेख.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




अभिव्यक्ती होते. सूक्ष्म व सखोल भाववृत्तींनी हृहय थरारुन इथे काव्यविश्व

साकार होते. हृदयातील या कंपीत होणाऱ्या स्पंदनाला निसर्गातील रंग, गंध,

स्वर, स्पर्श इत्यादींचा नाजुक अनुभवही पुरेसा होतो. आपल्या भोवतालच्या घटना

प्रसंगांनी सामाजिक-राजकीय वातावरणाने त्यांचे भावविश्व ढवळून निघत नाही,

कारण मुळातच ते आत्मलक्षी आहे, म्हणूनच त्यांच्या या भावविश्वात विविधते.

पेक्षा एकाच भावनेतील विविध परी भावधन स्वरूपात प्रगट होतात.

 मध्यंतरी इंदिरा संतांचे पतीच्या चिरविरहाच्या भावनेने विपुल काव्यलेखन

एका व्याकूल मनः स्थितीत जन्माला आले. या विषया पलिकडचे-विश्व जणु या

प्रतिभेने नाकारलेच असे वाटण्या इतपत परिस्थिती होती; पण 'रंगबावरी,

'बाहुल्या' या अलिकडील काव्य संग्रहात पुन्हा त्यांच्या भावविश्वाची क्षितीजे

बऱ्याच प्रमाणात रुंदावताना दिसतात. अशा कवितांचा जन्म अनेकदा बहिर्मुख

वृत्तीतून मात्र होताना दिसतो. म्हणून या कविता शेला, मेंदी मृगजळ या पूर्वीच्या

काव्यसंग्रहातील कविते इतक्या हृदयस्पर्शी होत नाहीत.

 संतांच्या कवितेतून व्यक्त होणारा एकाकीपणा मात्र अजूनही सूक्ष्म, आत्म-

मग्न आणि अंतर्मुख वृत्तीतून अधिक गहिऱ्या स्वरूपात व्यक्त होताना आढळतो.

 'नव कवींबरोबर आणि आजतागायत अशी काव्यरचना करूनही त्या नव-

कवीत बसू शकत नाहीत हा प्रा. रा. श्री. जोग यांनी मराठी कविता (१९४५ ते

१९६५) या व्याख्यान ग्रंथात मांडलेला. विचार (पृष्ठ. ३९) बऱ्याच अंशी ग्राहय.

वाटतो. कदाचित म्हणूनच नवकवींवर टीका झाली. पण इंदिरा संतांच्या काव्या-

वर विशेषत्वाने या संदर्भात झाली नाही.

 प्रयोजन शून्यता, रुचिरत्व, स्वव्यक्तिमन आकार साकारणे, मोजक्या सोप्या

छंदांना स्थान देणे, निसर्ग प्रतिभांचे मन व्यक्त करण्यासाठी सहाय्य घेणे इ. विशेष

त्यांच्या कवितेच्या वाचनातून लक्षात येतात.

 इंदिरा संतांच्या कवितेच्या वाटचालीत 'रंगबावरी' हा सर्वोत्कृष्ट ठरणारा

काव्यसंग्रह म्हणावा लागेल. मराठी कवितेत अलिकडच्या काळात इतक्या कौश-

ल्याने, हळूवारपणे विशुद्ध भावनिर्मिती करणे विरळ आढळणारी गोष्ट बनली

आहे. मृगजळ पर्यंत साकार झालेला एकच एक प्रत्यय, एकच ध्यास मोठा अति

आणि उत्कट असला तरी इंदिरा संतांपेक्षा त्यांच्या त्या एकेका कवितेवरच रसि-

कांचे लक्ष विशेष केंद्रित झाले होते. पण १९६४ साली प्रकाशात आलेल्या रंग-

बावरीने त्यांच्या प्रतिभेने घेतलेले नवे वळण लक्षात आणून दिले.गडद पण
आलेख         ४३