पान:आलेख.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





लौकिक घटनांनी व व्यावहारिक मूल्यांनी प्रत्यक्षात भरलेले आहे. अद्भुत आणि

आदर्शवादाचे प्रतीक वाटणारे भीष्माचे जीवन तितकेच लौकिक आणि आमच्या

सुखदुःखांशी एकरूप होणारे सामान्यही आहे पण याकडे मराठी प्रतिभेचे लक्ष

वेधले गेले नाही. अन्यथा भीष्माच्या जीवनावर 'मृत्युंजय' 'राधेय' सारख्या प्रदीर्घ

स्वतंत्र साहित्यकृती निर्माण होणे अवघड नव्हते. पितामह भीष्माचे हे प्रगल्भ रूप

मराठी साहित्यिकांच्या चिंतनातून ओघात का होईना पण प्रगट झालेले आहे.


 एकूण महाभारतातील भीष्माच्या व्यक्तिरेखेला अधिक विकसित करण्याचा

प्रयत्न मराठीतील साहित्यिकांनी केला आहे. भीष्माच्या कवित्त्वाच्या गाभ्याला

स्पर्श करून आपल्या प्रतिभेने त्यांनी भीष्माची जीवन कहाणी न्याहाळली आहे.

तीत नव्या जाणिवांची व चिंतनाची नवी भरही टाकलेली आहे. वि. अ.

खैरे, कर्वे, भागवत, भोसले, टिपणीस, कानेटकर, यांच्या लेखनात या गोष्टीचा

प्रत्यय येतो. भीष्माच्या प्रतिज्ञे मागे त्याची कृतज्ञतावृद्धी आणि शंततूने केलेल्या

त्यागाची जाणीव होती. ही नवी गोष्ट 'वि. आ. खैरे यांनी आपल्या 'वंशाचा

व्यास' या नाटकात लक्षात आणून दिली आहे. भीष्मासाठी शंततूने आपल्या प्रिय

पत्नीचा त्याग पत्करला हे प्रथमतः खैरे यांनी आपल्या नाटकातून मांडले आहे.

ही मराठी प्रतिभेने महाभारतात टाकलेली भर आहे. तो महाभारताचा एक नवा

अविष्कार आहे असे निश्चितपणे म्हणता येते. इरावती कर्वे आणि मधु भोसले

यांनी एखाद्या कल्पवृक्षासारखे भीष्माचे जीवन मानले या कल्पवृक्षाच्या सावलीत

कोणी आले नाही ही खंतही व्यक्त केली आहे. भोसले मरणन्मुख भीष्माची मन:-

स्थिती नव्याने चित्रित करतात. ती त्यांनी स्वतःच्या कल्पनेने महाभारताला

दिलेली एक नवी जोड आहे. असे म्हणता येईल. भीष्नाचे ऐन तरुणपणी अश्रू

हरवल्यामुळे निर्माण झालेल्या करूण स्थितीचे चित्र सामान्य माणसा सारखेच दुर्गा

भागवतांनी रेखाटले आहे.


 भीष्माच्या जीवनाची अशी ही विविध चित्रणे मराठीत आढळली तरी महा-

भारतात कलात्मक व्यक्तिमत्त्व लाभलेल्या भीष्माकडे मराठी साहित्यिकांचे पूर्णा-

शाने लक्ष केंद्रित झालेले दिसत नाही. मत्स्यगंधा, अंबा, शंतनू, प्रतिज्ञा, इच्छामरण

या संदर्भातच केवळ भीष्माची आठवण होते. भीष्माच्या जीवनातील सर्व घटना

प्रसंगाला आणि दुव्यांना नीट जाणून घेऊन भव्य साहित्यकृती मराठीत लिहिली

गेली नाही याची उणीव जाणवते. भीष्माच्या व्यक्तित्वाला नवे तेज प्राप्त करून

देण्याचे सामर्थ्य मराठी प्रतिभेत आहे याची जाणीव मात्र निश्चितपणे या साहि

त्याने करून दिली आहे.


आलेख         ९५