पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३९)

अर्से लिहिले आहे कीं, जेव्हां व्यासाला आपला पुत्र शुक याची वेदांतासंबंधानें योग्य समजूत पाडतां येईना, तेव्हां त्यानें त्यास जनकापाशीं पाठवून दिलें. जनक हा विदेही वंशाचा होता. त्याचें वर्तन सर्वथैव निवृत्तिपर असल्याने त्याला विदेही हें सार्थ नांव पडलें. जनकराजा असें म्हणे कीं, 'माझी संपत्ति अपरंपार आहे. कारण माझें असें कांहीं नाहीं. सर्व मिथिला नगरी जरी अग्निमुखी पडली, •तरी माझें असें कांहींच दग्ध होणार नाहीं.' एकदां ऋषिपदास पोहोंचलेल्या एका विदुषीनें जेव्हां जनकापुढे सन्यस्त वृत्तीची प्रशंसा करून राज्यसूत्रे चाल- विण्यांत खरें सौख्य नाहीं असें आपलें मत प्रदर्शित केलें, तेव्हां जनकानें दिलेलें उत्तर विचार करण्याजोगे आहे. तो म्हणाला 'राज्यकारभारांत जरी मी गुंतल्या- प्रमाणें दिसतों, तरी कोणत्याही प्रकारच्या मोहापासून मी अलिप्त आहे. ज्ञानाच्या योगानें मुक्ति मिळवितां येते हें जर खरें आहे तर राजा किंवा संन्यासी या उभयतांनाही मुक्ति मिळविण्यास हरकत नाहीं.' एकदां एका ब्राह्मणानें जनकास 'तुमची सत्ता कोणत्या प्रदेशावर चालते?' असा प्रश्न केला. तेव्हां जनक म्हणाला, "माझी सत्ता विस्तीर्ण प्रदेशावर चालते; परंतु संबंध पृथ्वीवर शोधलें असतांही माझें खरें राज्य मला सांपडेना. माझी मिथिला -नगरी, माझें घरदार व मुलें या सर्वांवर माझी सत्ता आहे, वगैरे विचारांत कांहीं काल लोटल्यावर माझ्या विचारांचा फोलपणा मला दिसून आला; व शेवटीं समजून आलें कीं, माझें असें निराळें राज्य नाहीं किंवा ज्यावर पूर्ण सत्ता आहे असा निराळा पदार्थ नाहीं. सर्वच माझें आहे. एकंदर दृश्य पदार्थास अंत हा आहेच. अशा क्षय पावणाऱ्या पदार्थावर ममत्व बुद्धि अधिष्ठित करण्या पासून फायदा कोणता ? माझें मन व सर्व पदार्थ यांवर स्वामित्व मिळविल्या- मुळे त्यांच्या स्वाधीन मी न होतां तेच माझ्या कह्यांत राहून देव, पितृ, अतिथि व भूतमात्र यांच्या प्रीत्यर्थ मी सर्व कर्मे करीत असतों. " अशा प्रका- रच्या उदात्त विचारांनी प्रेरित झालेला जनक, शीलासाठीं शेवटपर्यंत कष्ट सोसण्यास तयार झालेली त्याची कन्या वैदेही जानकी व सत्यनिष्ठ सदाचार- संपन्न श्रीराम यांची महति गावी तेवढी थोडीच आहे. स्वतःच्या अंगांतील विकारांस जिंकून त्यांनी मनावर व इंद्रियांवर स्वामित्व मिळविलें होतें. तसेंच सत्कर्मास विघ्ने आणणाऱ्या शत्रूंवरही त्यांनी जय मिळविला होता. धर्म व नीति यांच्याच पथांत चालण्याचें ज्याप्रमाणें श्रीरामानें व्रत केलें, तसेंच व्रत त्याच्या प्रजेनेंही पाळिलें. त्या कालीं पितृभक्त व सत्यवचनी म्हणून ज्याप्रमाणे रामाची स्तुति होऊं लागली तशीच प्रजावत्सल राजा म्हणूनही त्याची ख्याति झाली.