पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३८)

अत्यंत विद्वान् क्षत्रिय राजा ब्रह्मविद्येत ब्राह्मणांहूनही निष्णात होता. तथापि तो ब्राह्मणांस फार मान देत असे. परशुरामाशीं युद्ध करण्याचा जेव्हां रामावर प्रसंग आला, तेव्हां रामचंद्रानें त्याची केवळ ब्राम्हण म्हणून क्षमा मागितली. रामचंद्र वनवासास जाण्यासाठी निघाला तेव्हां त्यानें व सीतेनें ब्राह्मणांस द्रव्य वांटून दिले. त्या वेळीं राम म्हणाला- 'लक्ष्मणा, ब्राह्मण हे अभ्यासांत मग्न अस ल्यानें आपल्या चरितार्थाची काळजी बाळगीत नाहींत. यासाठी त्यांस दान देणें हे आपले कर्तव्य आहे.' क्षत्रियबलापेक्षां ब्रह्मतेजोबल हेच त्या काळीं श्रेष्ठ असें मानीत. म्हणूनच विश्वामित्रानें, असे उद्गार काढले - 'धिग्बलम् क्षत्रिय- बलम्, ब्रम्हतेजोबलम् बलम्' म्हणजे क्षत्रियबल व्यर्थ आहे. ब्रह्मतेजोबल हेंच खरें बल होय. कुरुपांचालांचा महाभारतांतील इतिहास वाचला असतां क्षत्रियांचे धर्ममार्गदर्शक क्षत्रियच असत असे दिसतें. श्रीकृष्ण, भीष्म, धर्म वगैरे क्षत्रियांनींच धर्मतत्त्वाचें विवरण व धर्मोपदेश केल्याचे आढळतें. बह्मतेजो- बलापेक्षां क्षत्रियतेजोबल त्याकालीं अधिक मानीत, ह्मणून ब्राह्मण देखील शस्त्र धारण करून युद्धांत सामील होत. सारांश रामायण व महाभारत यांच्या कालांतील सामाजिक स्थितींतील ठळक अंतर हेंच कीं, रामायणकालीं ब्रह्म- तेजोबलास व महाभारतकालीं क्षत्रियवलास विशेष मान देत. दुर्योधन, कर्ण, भीम, अर्जुन, भीष्म यांसारखे योद्धे कुरुपांचाल युद्धाच्या वेळीं धैर्यशौर्यादि गुणांनीं मंडित असल्याचें जसें दिसून येतें, तसेंच त्यांतील भीष्म, कृष्णासारखे क्षत्रिय अध्यात्मविद्येत निष्णात असल्याचें सिद्ध होतें. त्यांस स्वपक्ष व परपक्षाकडूनही योग्य मान मिळे. रामायणकालीं शौर्यापेक्षां सात्विक गुणांची विशेष महती वाढली. यासाठींच तत्कालीन समाजाचें चित्र रेखाटतांना वाल्मीकिनें सदाचार, सत्वस्थ वृत्ति, भूतदया वगैरे गुणांची महती गायिलेली असून रामायणांतील मुख्य पात्रें प्रेमळ, सद्वर्तनी व कोमल अंतःकरणाचीं असल्याचें सांगितलें आहे. श्रीरामाचा श्वशुर

वैदेही जनक राजा

याची जागोजागी स्तुति केलेली आढळते. जनकास राजर्षि म्हणत. बृहदारण्य- कोपनिषदांत असे लिहिले आहे कीं, जनकापार्शी ब्रह्मविद्या प्राप्त करून घेण्या- साठीं अनेक विद्वान् लोक येत. याज्ञवल्क्य ऋषीशीं होत असलेले वादविवाद लक्षांत घेतां, जनकराजा किती योग्यतेचा होता, हें समजून येतें. महाभारतांत