पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३०)

सल्ल्यानें त्यानें रामाची पत्नी सीता हिला हरण करण्याचे ठरविलें. राम आश्रमांत नसल्या वेळी तिला तो घेऊन गेला. रामाला अत्यंत दुःख झालें व तो तिला शोधून काढण्याच्या प्रयत्नास लागला.

 सीतेला रावणानें नेल्याचा सुगावा जटायूकडून लागतांच सुग्रीव नांवाच्या एका बलिष्ठ योद्धयास रामानें जवळ केले. त्याचा बंधु वाली यानें उन्मत्त होऊन त्याचें राज्य जिंकिलें व त्याच्या बायकोसही आपल्या ताब्यांत घेतलें. रामानें वालीचा सूड उगवून राज्य व कांता परत मिळविण्याच्या कामीं सुग्रीवास मदत केली. वाली लढाईत मारला गेला. सुग्रीवानें आपलें वानर नांवाचें सैन्य तयार केलें. व हनुमान, नल, नील, जांबुवंत यांस सीतेच्या शोधार्थ चोहोंकडे पाठविलें. सीतेला रावणानें लंकेस नेली असून ती अशोक वनांत आहे अशी बातमी हनु- मानानें आणिली. पुढे आपल्या प्रचंड सैन्यासह सुग्रीवादिक रामाचे मित्र व राम लक्ष्मण लंकेस जाण्यास निघाले. लंका हें बेट असल्यामुळे तेथें जाण्याची अड- चण आली. परंतु नलानें समुद्रावर पूल बांधून ती दूर करतांच ती मंडळी लंकेस गेली. तेथें रावणाशीं भयंकर युद्ध जुंपलें. रावणाचा बंधु बिभीषण रामाच्या पक्षास येऊन मिळाला. लंकेंत चाललेल्या घनघोर संग्रामांत रावण ठार झाला. कुंभकर्ण, इंद्रजित् वगैरे पराक्रमी वीरही निमाले.

 त्यानंतर रामचंद्र सीतेसह स्वदेशीं परत आला. त्या वेळीं वनवासाची मुदत संपल्यामुळे भरताच्या विनंतीवरून व वसिष्ठाच्या आज्ञेप्रमाणे रामानें राज्यसूत्रे हाती घेतलीं. सीता ही पर पुरुषाच्या अटकेंत होती इतक्यावरून तिच्या वर्तना- बद्दल प्रजेंतील एका इसमानें संशय घेतल्यामुळे तिला रामानें वनांत सोडिलें. त्या वेळीं ती गरोदर होती. वाल्मीकीच्या आश्रमांत ती प्रसूत होऊन तिला कुश आणि लव असे दोन पुत्र झाले. हे रामाप्रमाणेंच तेजःपुंज व पराक्रमी निघाले. रामानें अश्वमेध यज्ञ केला त्या वेळीं या मुलांनी वाल्मिकीनें रचलेलें रामायण गायिलें.. तें ऐकून रामास आनंद झाला व त्याला हे आपलेच मुलगे आहेत असें कळ- तांच त्यानें त्यांस पोटाशी धरिलें व सीतेचा स्वीकार करण्याकरितां तिला आश्र- मांतून बोलावून आणिलें. सीतेनें आपलें आचरण अत्यंत पवित्र आहे अशी सर्वांची खात्री पटविण्याकरितां पुढीलप्रमाणे शब्द उच्चारले:- " माझ्याकडून कायेनें, वाचेनें किंवा मनानें कोणतेंही वाईट कृत्य घडलें नसेल तर ही पृथ्वी मला पोटांत घेवो.” असें ह्मणतांच पृथ्वी दुभंग झाली व सीता तींत गडप झाली.