पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२९)

जवळच गंडकीच्या पलीकडे जनक राजाचें राज्य होतें. त्याला विदेह देश असे म्हणत असत; व मिथिला ही त्या देशाची राजधानी होती. जनकाची कन्या सीता ही उपवर होतांच त्यानें स्वयंवर मांडिलें व देशोदेशींच्या राजांना निमंत्रण करून शिवधनुष्यभंग करण्याचा व त्यायोगें सीतेस वरण्याची योग्यता अंगी असल्याचें सिद्ध करून दाखविण्याचा पण लाविला. अनेक राजांचा प्रयत्न व्यर्थ गेला; शेवटीं रामचंद्रानें तो पण जिंकतांच सीतेनें त्याच्या गळ्यांत माळ घातली. दशरथ वगैरे मंडळी आल्यावर लग्नकार्य यथासांग होतांच रामचंद्राच्या इतर सावत्र बंधूंचींही तेथेंच लग्नकार्ये झालीं व ते सर्व नववधूंसह अयोध्येस आले.

 दशरथाचा वृद्धापकाल समीप येतांच त्यानें ज्येष्ठ पुत्र रामचंद्रास युवराज करण्याचें योजिलें. परंतु त्याची तृतीय पत्नी कैकयी हिनें भरतास गादी देण्याबद्दल हट्ट धरिला. दशरथानें त्यापूर्वी एका प्रसंगी तिची इच्छा पूर्ण करीन अर्से वचन दिलें होतें. या वचनाची आठवण देऊन तिनें आपला हेतु तडीस नेण्यास पतीस भाग पाडलें. पित्याचें वचन खरें करण्यासाठी रामानें कैकयीच्या इच्छेप्रमाणे चवदा वर्षे वनवास स्वीकारला. सीतेनेंही पतीबरोबर अरण्यवास पत्करला व लक्ष्मण रामाबरोबर निघाला. याप्रमाणे राम, सीता व लक्ष्मण वनवासास गेल्यावर दुःखातिरेकानें दशरथ राजा लवकरच निवर्तला. भरत आजोळी नंदिग्रामीं होता तेथून परत येतांच त्याच्या मातोश्रीनें रामास घालवून दिल्याची हकीकत त्याला समजली. स्वतः राज्यपदारूढ होण्यास तो कबूल होईना. पुढें रामाची त्यानें गांठ घेतली व चवदा वर्षे संपतांच पुनः राज्यांत येईन असे अभिवचन त्याजपासून घेऊन, तो त्याच्या पादुकांसह अयोध्येस आला. पादुका सिंहासनावर ठेऊन भरत कारभार पाहूं लागला.

 वनवासी राम, सीता व लक्ष्मण यांसह प्रयागास (अलहाबाद) भारद्वाजाच्या आश्रमी गेला. तेथें चित्रकूट पर्वतावर वाल्मीकीच्या आश्रमांत जाऊन राहिला. त्या ठिकाणीं भरताकडून त्याला पित्याच्या निधनाची वार्ता समजली. पित्यास दिलेले वचन मोडतां येत नसल्यामुळे वनवासाची मुदत संपण्यापूर्वी परत येतां येत नाहीं असें त्यानें भरतास सांगितलें. चित्रकूटाहून ( बुंदेलखंडांतील एक टेंकडी ) गोदावरीच्या जवळपास असणाऱ्या दंडकारण्यांत राम फिरत असतां शूर्पणखा नांवाच्या राक्षस जातीच्या स्त्रीचें लक्ष्मणानें ( तिचें फाजील वर्तन पाहून ) नाक कापिलें. ही स्त्री लंकेचा राजा रावण याची बहीण होती. तिच्या