पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२८) श्रीरामनवमी. गंगा व गंडकी या नद्यांच्यामध्यें जो प्रदेश आहे, त्यांत प्राचीन काळी कोसल वंशाचे क्षत्रियलोक रहात असत. ते आपणास सूर्यवंशी ह्मणवीत.. दशरथ हा या कोसल देशाचा राजा असतांना अयोध्या ही त्याची राजधानी होती. दशरथास कौसल्या, कैकयी व सुमित्रा अशा तीन पत्न्या होत्या. कैकयीच्या उदरीं भरत, सुमित्रेच्या उदरीं लक्ष्मण व शत्रुघ्न, ज्येष्ठ पत्नी कौसल्येच्या उदरीं रामचंद्र याप्रमाणे त्याला चार पुत्र झाले. हे चौघेही धनुर्विद्येत निष्णात, स्वभावानें प्रेमळ, सत्यवचनी व निर्मल वर्तनाचे निघाल्या- मुळे त्यांची सर्वत्र वाहवा होऊं लागली. त्यांतही रामचंद्रानें आपल्या शीलाच्या योगानें सर्वाकडून धन्य धन्य असें ह्मणवून घेतलें कालेकरून त्याला विष्णूचा अवतार असें मानून त्याचा जन्मदिवस चैत्र शुक्ल ९ मी हा उत्सवदिनांत गणला गेला. श्रीरामाचें त्रोटक चरित्र पुढीलप्रमाणे आहे. रामचंद्र व लक्ष्मण लहान असतांनाच त्यांना विश्वामित्र ऋषीनें आपल्या आश्रमांत यज्ञकार्यांत विघ्ने आणणाऱ्या राक्षसांचा नाश करण्यासाठीं अयोध्येहून आणिलें. विश्वामित्रानें त्यांना धनुर्विद्या शिकविली. त्या ऋषीच्या आश्रमापासून