पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२५)

आहे. कधीं सुखवस्तु लोकांच्या येथें गायनवादनांच्या योगानें हा दिवस मोठ्या आनंदांत घालविला जातो. आपल्या गरीब नातेवाईकांस भोजनास निमंत्रण करण्याची चाल बऱ्याच ठिकाणीं दृष्टीस पडते.

 मलबारांत हा वर्षारंभाचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. संवत्सरप्रतिपदेच्या पूर्वदिवशीं घरांतील दागदागिने, हिरे, पाच वगैरे रत्नें, फळफळावळ व इतर अनेक शोभायमान जिन्नस देवघरांत व्यवस्थितपणें देव्हाच्यासमोर मांडतात. नंतर संवत्सरप्रतिपदेच्या दिवशीं उषःकालीं सुमारें प्रहर रात्र असतांना घरचा यजमान देवधरांत प्रवेश करून त्या वस्तूंस दीपा- रति दाखवितो. त्यानंतर त्याच्या कुटुंबांतील लहान मोठीं सर्व माणसे ( स्त्रिया व पुरुष ) एकामागून एक डोळे मिटून त्या खोलींत जातात व त्या वस्तूंच्या सन्निध पोहोंचतांच डोळे उघडून त्यांवर नजर घालतात. नंतर घरचा यजमान प्रत्येकास त्यांतून एखादा दागिना, फूल, फळ वगैरे देत असतो. त्या प्रांतांतील हिंदूलोक वर्षारंभाच्या दिवशी सकाळी उठतांच उत्तम व शुभ मानलेल्या पदार्थावर आपली नजर पडावी याबद्दल खबरदारी घेतात. मल्याळ खेरीजकरून ही चाल इतर ठिकाणीं नाहीं. मकरसंक्रमणाच्या दिवशींही तेथील लोक मोठा उत्सव कर- तात. ( याचें वर्णन त्या सणासंबंधी केलेल्या विवेचनांत दिले आहे. )

हेतु व बोध

 कोणत्याही कारणानें वर्षारंभ चैत्र शु. १ देच्या दिवशीं ठरलेला असो, तो महत्त्वाचा आहे यांत संशय नाहीं. एकमेकांची प्रेमानें भेट घेऊन नवीन वर्ष सर्वांस मुखाचें जावें यासाठीं जगन्नियंत्याची प्रार्थना करावी व अनेक आधि- व्याधींतून व संकटांतून आपलें गेल्या सालीं रक्षण केल्याबद्दल अंतःकरणपूर्वक त्याचे आभार मानावे. गेल्या साली आपण जीं कांहीं बरीं वाईट कृत्यें केलीं असतील त्यांचा आपल्या मनाशीं आढावा काढून नूतन साली आपले वर्तन विशेष शुद्ध, सात्विक व प्रेमळ करण्याचा निश्चय करावा. प्रत्येक मनुष्य जें कांहीं बरें वाईट कर्म करतो त्याची रोजनिशी मरणोत्तर यमाजीभास्करापुढे वाचून दाखविण्यासाठीं चित्रगुप्त ठेवीत असतो, असें हिंदू समजतात. आपणच आपला चित्रगुप्त होऊन तीं कृत्यें टिपण्याची जर पद्धत ठेवूं तर आपला बराच फायदा होईल. तरुण जनांस प्रपंचांत अनेक कार्ये करावयाची अस तात. योग्य वय प्राप्त होतांच समाजाचा एक घटकावयव या नात्यानें अंगावर