पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२४ )

आला तो दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदा होता, यासाठी हा दिवस वर्षांचा पहिला दिवस मानला गेला. वसू नांवाचा राजा तपश्चर्या करून मनुजेंद्र झाला व त्याला स्वर्गातील अमरेंद्रानें या दिवशीं वस्त्रालंकार वगैरे देऊन त्याचा गौरव केला. ब्रह्मदेवानें चैत्रशुक्ल प्रतिपदेस सृष्टि निर्माण केली, वगैरे कित्येक कारणांवरून हा दिवस संवत्सराचा प्रथमचा दिवस ठरला अशी धार्मिक समजूत आहे. तसेंच ६० बार्हस्पत्य संवत्सरांस जीं नांवें दिलीं आहेत ती नारदऋषींच्या ६० पुत्रांची नांवें होत अशी एक पुराणांतरी कथा सांपडते.

शास्त्रोक्त विधि व रूढि.

 वर्षारंभाचा दिवस प्राप्त होतांच सर्व कुटुंबवत्सल लोकांनी आपल्या घरा- समोर गुढी उभारावी. कलश व पताकायुक्त गुढी ही आनंदोत्सवाची दर्शक आहे. या गुढीची गंधपुष्पकुंकुमानें पूजा करावी, स्त्रीपुरुष व मुलांनी उत्तम. वस्त्रे परिधान करावीं, मंगलस्नानादि विधि आटोपल्यावर निंबभक्षण करावें, महान् महान् ऋषी निंबभक्षण करून कित्येक वर्षे सतेज रहात असत असें पुरा- णांत सांगितलें आहे; त्यामुळे निंबभक्षणविधीस शास्त्राचा पाठिंबा मिळाला. निंबाचे प्रफुल्ल अंकुर आणून मिचें, हिंग, लवण, जिरें व ओंवा यांसह भक्षण करावें. आरोग्य, बल, बुद्धि व तेज यांची वृद्धि करण्यास निंबभक्षण कारण होतें, असें आर्यवैद्यकाचें मत आहे. या दिवशीं सहकुटुंब सहपरिवार देवदर्शन घ्यावें. •जोशांकडून पंचांग वाचवून तें श्रवण केल्यावर त्यांस शिधा द्यावा. पुढील सालाचें, जोशी भविष्य वर्तवीत असतात अशी भावना सामान्यतः जनांत आहे. यासाठी पाऊस, धान्यसमृद्धि, आयव्यय वगैरे बाबींचा खल भाविक लोक करीत असतात. शास्त्रोक्त विधीबरहुकूम सर्वच लोक जरी चालत नाहींत तरी बहुजन समाज चालत असतो. वर्षप्रतिपदेचा दिवस वर्षांतील साडेतीन मुहूता- तील एक असून त्या दिवशीं आरोग्यप्रतिपद्व्रत ( आरोग्यप्राप्तीसाठी ) विद्याव्रत ( विद्येचा लाभ व्हावा एतदर्थ ) व तिलकव्रत ( ऐश्वर्यप्राप्तीस्तव ) करावें असें भविष्योत्तर व इतर पुराणांत सांगितले आहे. तथापि या व्रतांचा हल्लीं प्रचार नाहीं. नवीन वर्षाची प्रतिपदा प्राप्त होतांच सर्व कुटुंबवत्सल लोक मंगल स्नानादिक आटोपल्यावर मिष्टान्नभोजन संपवून देवदर्शन घेत असतात; कांहीं ठिकाणी त्या दिवशीं स्त्रियांस व मुलांस नवीन वस्त्रें देण्याची चाल आहे. पंचांगश्रवणानंतर निमंत्रित मंडळीस अत्तर, गुलाब, पानसुपारी देण्याचा प्रघात