पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१९)

आहे. म्हणून गौरीच्या आगमनाच्या दिवशीं हळदकुंकवाचा समारंभ करण्याची चाल महाराष्ट्रांत आहे. उत्तरदेशीं क्वचित् ठिकाणीं हा उत्सव पाळला जातो व बंगाल्यांत तर मुळींच पाळत नाहीत. गौरी तृतीया पाळणाऱ्या कुटुंबांत गौरीची स्थापना करून तिच्या पुढें चित्रे वगैरे ठेवतात. गौरीच्या दर्शनासाठी सौभाग्य- वती स्त्रिया व लहान मुली शेजारच्या घरी जाऊन हळदकुंकुं व फुलें घेतात. रात्रौ गौरीसमोर गीत गाणें, फुगडी घालणें वगैरे मनोरंजक प्रकार होत अस- तात. हा उत्सव स्त्रियांचाच आहे असे म्हणतां येईल. मत्स्यजयंती विष्णूच्या देवालयांत पाळण्यांत येते. विष्णूनें मत्स्यावतार धारण करून प्रलयाच्या वेळीं मानव जातीच्या मूळ पुरुषांचें व स्त्रियांचें रक्षण केलें अशी कथा शतपथ ब्राह्मणांत आहे. पूर्वकालीं जलप्रलय होऊन मानवजातीचा अंत होण्याचा प्रसंग आला होता तेव्हां परमेश्वरानें नौकेच्या योगानें व इतर परीनें तिचें रक्षण केलें अशी कथा ख्रिस्ती, मुसलमानी व पारसिक धर्मग्रंथांत आहे. यावरून पूर्व कालीं जलप्रलय खरोखरच झाला असावा असे दिसतें. चैत्र शु. ५ ही श्रीपंचमी या नांवानें ओळखली जाते. या दिवशीं गौरीप्रीत्यर्थ सुवासिनींस भोजन वगैरे देण्याची चाल महाराष्ट्राच्या कांहीं भागांत आहे. चैत्र शु. ६ ही स्कंद- षष्ठी व अशोक षष्ठी या नांवानें प्रसिद्ध असून उत्तर हिंदुस्थानांत स्त्रिया देवी- प्रीत्यर्थ अशोक षष्ठीचें व्रत आचरीत असतात. शिव-पुत्र स्कंद याच्या प्रीत्यर्थ विशेष कांहीं उत्सव होत नाहीं. या तिथीस स्कंदषष्ठी हें नांव आहे इतकेंच. अशोक षष्ठी पाळणाऱ्या स्त्रिया अशोक पुष्पाच्या ६ फुलांच्या कळ्या पाण्यांत घालून तें पाणी पीत असतात. अशी एक कथा प्रचलित आहे कीं पूर्वकाली एका ऋषीस त्याच्या घराच्या समोर एक मूल सांपडले. या मुलीचें योग्य प्रकारें संगोपन करून योग्य कालीं तिला एका राजपुत्रास दिली. ती आपल्या पतीच्या घरी जाण्यास निघाली तेव्हां त्या ऋषीनें तिला थोड्या अशोक वृक्षाच्या बिया दिल्या व मार्गक्रमण करतांना त्या बिया रस्त्यांत टाकण्यास तिला सांगितलें. या बिया उगवून रस्त्याच्या दोन्ही बाजूंस अशोक वृक्षांची रांग तयार होईल व तुला कांहीं संकट प्राप्त झाले असतां या झाडांजवळ येऊन मला हांक मार म्हणजे मी येईन व तुझ्या संकटाचें निवारण करीन असे त्या ऋषीनें मुलीस सांगितले. कार्लेकरून त्या राणीच्या कुटुंबावर अनर्थ कोसळला व एकाच वेळीं तिचे मुलगे व सुना मृत्युमुखी पडल्या. तेव्हां त्या स्त्रीनें आपल्या पित्याप्रमाणें पालन केलेल्या ऋषीचा धांवा केला. त्यानें त्या अशोक वृक्षांमधून येऊन तिल.