पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८)

मत्स्यजयंती आहे असे कित्येक मानतात. चैत्रांत दहीं, दूध, तूप आणि यांचा त्याग करून दंपत्यपूजनात्मक असे गौरीचें व्रत करावें. चैत्र शु. द्विती- येच्या दिवशीं प्रदोषकालीं बालेंदूचें पूजन करून चंद्रव्रत करावें आणि याच दिवशीं दवण्यानें शिवगौरीची पूजा करावी. चैत्र शु. तृतीयेपासून एक महिना- पर्यंत शिवगौरीचें आंदोलनव्रत करावें. याच दिवश रामचंद्राच्या दोलोत्स- वाचा आरंभ करून तो एक महिना चालवावा. इतर देवतांचाही आंदोलनोत्सव करावा. चैत्र शु. तृतीयेच्या दिवशीं मत्स्यजयंती व ९ मीच्या दिवशीं श्रीराम- जयंती याप्रमाणें जयंत्युत्सव करावे. आणि शु. ११ चे दिवशीं श्रीकृष्णाचा आंदोलनोत्सव करावा. आणि शु. १२ स मदनोत्सव करावा. त्रयोदशीस अनंतपूजनवत करावें व १४ स नृसिंहाचा दोलोत्सव करावा. चित्रा नक्षत्रानें युक्त अशा चैत्री पौर्णिमेस चित्रवस्त्रांचें दान करणें सौभाग्यदायक असून रवि, बृहस्पति व शनिवार यांहीं युक्त अशा चैत्री पौर्णिमेस श्राद्धादिक केल्यास अश्वमेधाचें पुण्य पदरीं पडतें असें धर्मसिंधूचें मत आहे. चैत्र शु. ११, पौर्णिमा किंवा मेषसंक्रांति यांतून कोणत्याही दिवश वैशाखस्नानास आरंभ करावा. उजाडतांच थंड पाण्यानें एक महिनापर्यंत स्नान केल्याच्या योगानें पुण्यप्राप्ति होते असें धर्मसिंधूचें मत असून कित्येक स्त्रिया (विशेषत: विधवा ) वैशाख- स्नानाचें पुण्य मिळविण्यास कसूर करीत नाहींत. याप्रमाणें चैत्र मासांतील धर्मकृत्यें आहेत. चैत्रमहिन्यांत खालीं लिहिलेलीं धर्मकृत्यें करावीं असे शास्त्रांत सांगितलें आहे:-

 १ संवत्सरारंभ, २ देवीनवरात्रोत्सव, ३ रामजन्मोत्सव, ४ प्रपादान, ५ विद्या- व्रत, ६ बालेंदुव्रत, ७ मत्स्यजयंती, ८ मदनोत्सव, ९ आंदोलनोत्सव, १० नागपूजा, ११ हयव्रत, १२ अनंगत्रत, १२ हनुमज्जयंती, १४ वैशाखस्नानारंभ, १५ मन्वादि, १६ कल्पादि.

चैत्रांतील उत्सव.

 चैत्र महिन्यांत जे उत्सव चालतात ते प्रांतपरत्वें भिन्न आहेत. चैत्र शु. १ स ध्वजारोपणादि उत्सव दक्षिणदेशीं विशेष दृष्टीस पडतो. चैत्र शु. ३ येस गौरीतृतीया असे म्हणतात. या दिवशीं गौरी आपल्या माहेरीं येते व एक महिना राहून वैशाख शु. ३ येस परत आपल्या (पतीच्या ) घरीं जाते अशी समजूत