पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२)

झटले आहे कीं, पदार्थाचें आकर्षण करणे हा पृथ्वीचा नैसर्गिक धर्म आहे. सृष्टिनियमानुसार सर्व पदार्थ पृथ्वीवर पडतात. भास्कराचार्यानेही यासंबंधानें असें म्हटले आहे कीं

 आकृष्टिशक्तिश्च मही तथा यत् खस्थं गुरु स्वाभिमुखं स्वशक्त्या आकृष्यते तत्पततीव भाति ॥

गोलाध्याय - भुवनकोश

 (अर्थ - पृथ्वीच्या अंगी आकर्षणशक्ति आहे. ती आकाशांतील एखादा जड पदार्थ स्वशक्तीनें आपणांपाशीं ओढते, तो पडतो असें भासतें.) या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार सर्व गोल सूर्याभोवती फिरतात हा शोध मात्र आपल्या देशांत झाला नाहीं. याला कारण त्रासदायक राजकीय क्रांत्याच असाव्या. पृथ्वी निराधार आहे, ती गोल आहे, ग्रहणाचें खरें कारण पृथ्वीची किंवा चंद्राची छाया होय वगैरे अत्यंत महत्वाच्या गोष्टींचें ज्ञान कित्येक शतकांमागे आमच्या देशांतील शोधकांस झालें होतें. या सर्व गोष्टींचा विचार केला असतां आधुनिक कालांत आमच्या हस्तें ज्योतिषशास्त्राची कांहींच सेवा झाली नाहीं, याबद्दल वाईट वाटतें. असो. वर्ष, मास, वार यांच्या प्रमाणेंच

काल किंवा शक

यांचे ज्ञान असणे इष्ट असल्यावरून तत्संबंधी माहिती पुढे देत आहों. त काल मोजण्यास जगाच्या आरंभाचें वर्ष घेणे शक्य नाहीं. या बाबीचा विचार केला असतां आपल्या देशांत 'राजा कालस्य कारणम्' या म्हणीची यथार्थता दिसते. महंमदी, खिस्ती, पारशी, चिनी वगैरे लोकांनी आपल्या धर्मप्रवर्तकां- वरून काल मोजण्याचें आरंभिलें. आमच्या देशांतील विशेषत: 'शक' या नांवानें ओळखल्या जाणा-या परकीयांच्या स्वाया हटविणाऱ्या कर्त्या पुरुषांवरून काल मोजण्याचा प्रघात पडला, अशी सामान्यतः समजूत आहे. पुढे पुढे तर 'शक' हाच शब्द 'काल' या अर्थी वापरण्यांत आला. सध्यां जे निरनिराळे काल किंवा शक चालू आहेत, त्यांत सप्तर्षिकाल, विक्रमकाल, शालिवाहनकाल, बंगाली सन, अमली सन, फसली सन, सूरसन, मगीसन, कोल्लम किंवा परशुरामकाल, नेवार- काल, लक्ष्मण सेनकाल, राजशक, विलायती सन आणि ख्रिस्तीसन हे मुख्य होत. त्यांतही विक्रमकाल, शालिवाहन काल व ख्रिस्तीसन हे या देशांत विशेष प्रमाणावर रूढ आहेत.