पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११ )

ओळखिले जाणारे सूर्य व आमच्यापासून लक्षावधि कोश लांबच्या पल्लयावर फिरत असणारे गुरु, शनि वगैरे ग्रह किंवा पृथ्वी यांची नजर आम्हां क्षुद्र मानवांवर असून ते आमच्या बऱ्यावाईटाचे कर्ते आहेत किंवा कसें, पूर्वकर्मा- नुसार यशापयशाची प्राप्ति होत असते, असे ठाम समजणाऱ्या आह्मीं हिंदूंनीं ज्योतिषावरून ठरणाऱ्या फलांचा विचार करण्यांत अर्थ आहे किंवा नाहीं, हे स्वतंत्र व वादग्रस्त प्रश्न आहेत. इतकी गोष्ट मात्र खरी आहे कीं, मनुष्यप्राणी आपल्या भविष्यत्कालीन सुखदुःखाचें ज्ञान मिळविण्यास सदा उत्सुक असतो. तेव्हां फलज्योतिषाचें महत्व कमीजास्त प्रमाणानें पृथ्वीच्या पाठीवरील सर्व देशांत आहे. या देशांत कदाचित् तें विशेष प्रमाणावर मानले जात असेल इतकेंच. या देशांतील लोकांच्या वांट्यास अनेक प्रकारच्या राजकीय,धार्मिक व सामाजिक क्रांत्या आल्यामुळे सहजींच त्यांची प्रवृत्ति दैवावर हवाला टाकण्याकडे होऊन फलज्योतिषाचें महत्व या देशांत वाढले असावें. यासंबंधानेंही येथील लोकांनीं बरेच परिश्रम केले असून तत्संबंधी वाङ्मय अस्तित्वात आलें. मुहूर्तमार्तड, रत्नकोश, मुहूर्तचिंतामणि, मुहूर्तसिंधु, ज्योतिर्विदाभरण वगैरे किती तरी ग्रंथ आज उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्षाच्या आरंभी नभोमंडळत असणाऱ्या ग्रहांवरून

संवत्सरफल

सांगण्याची जी पद्धति आहे, तिच्यासंबंधाचे कल्पलता, राजावलिजगन्मोहन, नरेंद्रवल्ली, समयसिद्धांजन वगैरे ग्रंथ आहेत. स्वरोदय व सारोद्धार हे एका प्राचीन जैन लेखकाचे शकुनासंबंधाचे ग्रंथ आहेत. मुहूर्त, शकुन, योग, पुण्यकाळ वगैरे पाहून कार्यास आरंभ करणारांस तुकारामबुवांनी केलेला उपदेश लक्षांत ठेवण्याजोगा आहे. तुका म्हणतात

विठ्ठलाचें नाम घ्यावें । पुढे पाऊल टाकावें ॥
अवघा मुहूर्त शकुन । हृदयीं विठ्ठलाचें ध्यान ॥
ऐसा पाहिजे हा योग । लाभा उणें काय मग ॥
तुका ह्मणे हरिच्या दासा । शुभ काळ सर्व दिशा

हाच खरा प्रगतीचा मार्ग आहे, हे कोण कबूल करणार नाहीं ?

 वरील विवेचनावरून लक्षांत येईल कीं, कालाच्या गतीसंबंधानें वगैरे प्राचीन कालीं बरेच शोध करण्यांत आले. गुरुत्वाकर्षणासारख्या महत्वाच्या बाबीचाही विचार प्राचीन काली करण्यांत आला. ब्रह्मसिद्धांताचा लेखक ब्रह्मगुप्त यानें असे